Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्व-राज्यांतील 'स्व'चा व्याप । २१९

त्याची कसणूक व निगा तो स्वतः व त्याचे कुटुंबीय हे स्वतंत्रपणे करीत असतात. त्यामुळे ते परस्परांपासून विलग असतात. धनोत्पादनाच्या दृष्टीने त्यांचे हितसंबंध गुंतलेले नसतात. प्रत्येक शेतकरी स्वतंत्रपणे पोटाचा उद्योग करूं शकतो. त्यामुळे शेतकरी हा संघटित होऊं शकत नाही. श्रमविभाग त्याच्या व्यवसायांत होत नाही, विविधता त्यांत येत नाही, कृषिशास्त्राची तो वाढ करूं शकत नाही. यामुळे शेतकरी कायम मागासलेला राहतो आणि भांडवलादार, जमीनदार, बुद्धिजीवी, कारागीर यांच्याप्रमाणेच तो पुराणवादी व क्रांतिविरोधी होऊन बसतो. कामगार मात्र, गिरण्या- कारखान्यांत विलगपणें काम करूं शकत नसल्यामुळे अपरिहार्यपणेंच एकजीव होतात. त्यांचा जीवनउद्योग त्यांना एकत्र बांधूनच ठेवतो. त्या उद्योगांत यांत्रिक प्रगतीशीं नित्य संबंध येत असल्यामुळे तो पुरोगामी होतो. म्हणूनच तो अटळपणें क्रांतिकारक होतो. शेतकऱ्याला अशी कसलीच संधि नसल्यामुळे तो नेहमी विघटितच असावयाचा. तो बटाट्याचें पोतेंच राहवयाचा. (मार्क्स-एंगल्स- सिलेक्टेड वर्क्स, खंड १ला, पृ. ३०३).
 मार्क्सचें हें मत अत्यंत हास्यास्पद आहे हें इतिहासानेच दाखवून दिलें आहे. कम्युनिस्ट क्रांति, त्याच्या मतें, इंग्लंड, जर्मनी या प्रगत भांडवली देशांत व्हावयाची होती; पण ती झाली रशिया व चीनमध्ये. तेथे कामगारवर्ग उदयालाच आला नव्हता. चीनमध्ये तर तो अस्तित्वांतच नव्हता. आणि माओ-त्से-तुंग याने शेतकऱ्यांची संघटना करूनच चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांति घडविली. रशियांत कामगारवर्ग थोड्या प्रमाणांतच होता. त्यामुळे सोव्हिएट नेत्यांना किसानांचे साह्य घ्यावेंच लागलें. पण मार्क्सवादी भ्रमांत ते पुरते अडकलेले असल्यामुळे प्रारंभीच्या काळांतहि किसानांना ते कामगारवर्गाला पोसणारे गुलाम अशा दृष्टीनेच वागवीत असत.
मार्क्सवादी भ्रम
 मार्क्सचा तो सिद्धान्त मुळांतच तर्कदुष्ट होता. धनोत्पादन साधनामुळे. कामगार एकजीव होतात आणि म्हणून ते संघटित होऊं शकतात ही कल्पनाच अशास्त्रीय आहे. एखाद्या कारखान्यापुरतें फार तर तें खरें असेल; पण मार्क्स, "जागतिक कामगारांनी वर्गभेदाच्या तत्त्वावर संघटित व्हावें" असें सांगत होता. ज्यांनी सात जन्मांत एकमेकांची तोंडें पाहिलेली नव्हतीं, ज्यांना एकमेकांच्या अस्तित्वाची सुद्धा जाणीव नव्हती व ज्यांची आर्थिक स्थिति परस्परांच्या तुलनेने अत्यंत विषम होती त्या कामगारांची संघटना मार्क्सला सुलभ वाटत होती आणि कायम एकमेकांच्या सान्निध्यांत राहणारे, समदुःखी, समश्रद्ध शेतकरी मात संघटनेला अपान! असे भ्रम मार्क्सवादच पोसूं शकतो.
 लोकमान्य टिळकांना असला भ्रम कधीच नव्हता. मित्र वर्गामध्ये निरनिराळ्या कारणांनी भेद असतात हें ते जाणीत होते; पण हे भेद राष्ट्रसंघटनेच्या आड येतील हें त्यांना मुळीच मान्य नव्हतें. वर्गभेदाचें भ्रामक तत्त्वज्ञान त्यांनी