२१८ | केसरीची त्रिमूर्ति
विशेष काय?
आज सर्व जगांत शेतकरी, कामगार व एकंदर कष्टकरी जनता यांचा जयजयकार चालू आहे. भांडवली देशांत सुद्धा यांना अग्रमान दिला जातो. 'जय किसान, जय जवान' ही आपली घोषणा सुप्रसिद्धच आहे, असें असतांना लोकमान्यांनी शेतकरी हा देशाचा कणा आहे, राष्ट्राचा आत्मा आहे, असें सांगितले यांत विशेष तें काय, असें वाटण्याचा संभव आहे; पण आपण हें ध्यानांत घ्यावें की, ज्या वेळीं टिळकांनी हें महासत्य सांगितलें त्या वेळीं, म्हणजे १८८० च्या सुमाराला, त्याचा उच्चार करणारे जगांत ते एकटेच नेते होते. चीनचे नेते डॉ. सनयत् सेन ह्यांना त्या राष्ट्राचे जनक मानण्यांत येतें; पण त्यांचा सर्व भर लष्करी उठावणीवर होता. मानवेंद्र रॉय यांनी म्हटलें आहे की, १९२१ सालापर्यंत राष्ट्राची खरी शक्ति किसानांमध्ये आहे, याचा उमग त्यांना पडला नव्हता. चार पिस्तुलें जमा केलों की क्रांति होते, असा त्यांचा समज होता. शिवाय ज्या साम्राज्यवादी ब्रिटन, फ्रान्स ह्या देशांनी चीनवर भयानक अत्याचार केले होते त्यांची आपल्याला मदत होईल, अशी त्यांची शेवटपर्यंत श्रद्धा होती. (रेव्होल्युशन अँण्ड काउंटर रेव्होल्यूशन इन् चायना, पु. २५१-३२०). पाश्चात्त्य देशांत याच कालखंडांत इटली, जर्मनी यांची राष्ट्रसंघटना चालू होती, पण सरंजामदार, सरदार, लष्कर यांच्या बळावरच ती उभारणी चालू होती. शेतकरी ही महाशक्ति आहे, या सत्याचा अवगम तेथील नेत्यांना झाला नव्हता. जपानमध्येहि हीच स्थिति होती. १८५५ च्या सुमारास त्या देशांत अर्वाचीन युग सुरू झाले; पण तेथल्या नेत्यांनी नवीन जपान घडविला तो सरदार, सरंजामदार, लष्कर, राजा यांच्या शक्तीच्या आश्रयानेच घडविला. १८८० साली शेतकरी, किसान हा राष्ट्राचा आत्मा आहे, हा सिद्धान्त मांडणारा जगांत लोकमान्य टिळक हा एकच महापुरुष होता.
बटाट्याचे पोते
मार्क्सवादी लोक शेतकरी, कामकरी, किसान, जवान म्हणजे एकंदर जी जनता तिच्या नांवाने उद्घोष करीत असतात; आणि अर्वाचीन काळांत मार्क्सचे अनुयायी किसानांच्या संघटना बांधतातहि. पण हें सर्व १९२० नंतरचें आहे. तोपर्यंत किसान, शेतकरी ही एक शक्ति आहे, हें मार्क्सवादाला मान्यच नव्हतें. मार्क्सचा सर्व भर गिरणी कारखान्यांतील कामगारांवर होता. खरे क्रांतीचे नेते, त्याच्या मतें, कामगारच होते. क्रांतीच्या आघाडीवरचे शिपाई म्हणजे कामकरीच होत, असा त्याचा सिद्धान्त होता. भांडवलदार, जमीनदार, व्यापारी, बुद्धिजीवी हे वर्ग तर क्रांतिकारक नव्हेतच; पण मार्क्सच्या मतें किसानहि नव्हेत. मार्क्सचें किसानांच्याबद्दल फार वाईट मत होतें. तो शेतकऱ्यांना 'बटाट्याचें पोतें' म्हणत असे. त्याच्या मतें शेतकरी हा एक वर्ग होऊच शकत नाही; कारण तो संघटित होणें अशक्य आहे. प्रत्येक शेतकऱ्याजवळ दोन-चार एकरांचा जमिनीचा लहान तुकडा असतो आणि