Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१६ । केसरीची त्रिमूर्ति

वेदान्ताचे उपासक होते. भारतांत हैं अद्वैत त्यांना प्रत्यक्षांत कोठे दिसलें? हिंदी राष्ट्र व शेतकरी आणि कामकरी यांच्यांतील अभेदाचें दर्शन त्यांना प्रारंभापासूनच झालें होतें.
हाच धर्म
 "हिंदुस्थानची खरी स्थिति पाहवयाची असेल, तर शहरें पाहून उपयोग नाही. खेड्यांतील शेतकऱ्यांची किंवा मजुरांची स्थिति पाहिली पाहिजे." (केसरी, १४-१-१९०२). "हिंदुस्थान ही आमची मातृभूमि आणि देवता, हिंदुस्थानवासी हेंच आमचें बंधुत्वाचें नातें, व त्यांची सामाजिक व राजकीय स्थिति सुधारण्याचा एकनिष्ठ प्रयत्न करणे हाच आमचा धर्म." (केसरी, १९-१२-१८९३). असे विचार त्यांनी केसरीत ठायी ठायी मांडलेले आढळतात.
 लोकमान्यांनी सुरू केलेल्या गणोशोत्सवांत नवीन काय होतें? "साळी, माळी, सुतार, रंगारी, ब्राह्मण, व्यापारी, मारवाडी, चांभार ह्या सर्व जाती, क्षणभर आपला जातिमत्सर सोडून देऊन, परस्परांशी एकदिलाने व एका धर्माभिमानाने मिसळल्या" ही या उत्सवांतली आनंददायक अशी विशेष गोष्ट होती. (केसरी, १८-९-१८९४.)
 'ब्राह्मण आणि त्यांची विद्या' असें एक पुस्तक प्राचार्य महादेव शिवराम गोळे यांनी लिहिलें होतें. त्यांत ब्राह्मण समाजाच्या ऱ्हासाची कांही कारणमीमांसा त्यांनी केली होती. या पुस्तकावर टीका करतांना टिळकांनी म्हटलें आहे, "सर्व हिंदु समाजांस कुदशा प्राप्त झाली आहे. तिचा विचार न करतां केवळ ब्राह्मणांच्या ऱ्हासाचें निदान ठरविणें म्हणजे पुच्छग्राही, पादग्राही आंधळ्याप्रमाणे मीमांसा करणें होय. हें एकदेशीय व चुकीचें आहे." अशी टीका करून शेवटीं निष्कर्ष म्हणून त्यांनी सांगितलें आहे की, "जें कांही करावयाचें तें सर्व जातींकरिता व सर्व प्रांतांतील लोकांकरिता, त्यांस बरोबर घेऊन, त्यांच्या साहाय्यानेच केलें पाहिजे. शंभर वर्षांपूर्वी दक्षिणेतील ब्राह्मणांनी इतर प्रांत काबीज करण्याच्या कामी शौर्य व साहस प्रकट केलें होतें. आता सार्वजनिक हिताच्या कामीं पुढाकार घेऊन ती चळवळ सर्व राष्ट्रभर पसरविण्याचें काम ब्राह्मणांनीच अंगावर घेतले पाहिजे. यांत ब्राह्मणांनी निष्काम पुढारीपण करावें."
 खरा हिंदुस्थान खेड्यापाड्यांत आहे आणि येथे राष्ट्र निर्माण करावयाचें म्हणजे या खेड्यापाड्यांत जागृति करावयाची, असा टिळकांच्या मनाशी सिद्धान्त झालेला होता. "राष्ट्रीय महोत्सवांत सुशिक्षितांनी काय केलें पाहिजे" हें सांगतांना त्यांनी सांगितले आहे की, त्यांनी मोठ्या जनांना प्रचंड सभांचें रूप द्यावें व खेड्या-पाड्यांतील झोपडींत राजकीय चळवळीचा प्रवेश करून द्यावा. बहुत श्रमांनी त्यांनी स्वतः पैदा केलेलें नैतिक व धार्मिक ज्ञान लिहिता-वाचता न येणाऱ्या खेड्या-पाड्यांतील आपल्या बंधूंना त्यांनी सुलभ उपायाने द्यावें, व आपली खरी स्थिति