Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-१-

स्व-राज्यांतील 'स्व'चा व्याप


राष्ट्राचा आत्मा
 लो. टिळक अमरावतीस गेले असतांना, एक भलें मोठें वऱ्हाडी पोगोटें घातलेला शेतकरी त्यांच्या दर्शनास आला होता. 'हा खेड्यांतील कुणबी माणूस, लोकमान्यांना भेटून काय करणार', असें वाटून दारावरील स्वयंसेवक त्याची दाद घेईना; पण त्यांचें बोलणें ऐकून लोकमान्य स्वतःच बाहेर आले. शेतकऱ्याला फार आनंद झाला. त्यांच्या पायांवर मस्तक ठेवून थोड्या वेळाने तो परत गेला. तेव्हा स्वयंसेवकाकडे वळून लोकमान्य म्हणाले, "हिंदुस्थानांत शेतकरी हा राष्ट्राचा आत्मा आहे. त्याच्यावरील मालिन्याचा पडदा जर दूर करतां आला तरच हिंदुस्थानचा उद्धार होईल. याकरिता शेतकरी आपला व आपण शेतकऱ्याचे, असे आपणांस वाटावयास हवें." (लोकमान्य टिळक आठवणी व आख्यायिका खंड, २, पृ. ३८.)
 'समाइकीने उभारलेल्या भांडवलाचे कारखाने' या केसरीच्या पहिल्या वर्षी लिहिलेल्या लेखांतच त्यांनी म्हटलें आहे, "देश सधन असो वा निर्धन असो, जित असो वा अजित असो; लोकसंख्येच्या मानाने हलक्या दर्जाचे म्हणजे काबाडकष्ट करून निर्वाह करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असावयाची. याकरिता या समाजाची स्थिति जोंपर्यंत सुधारली नाही तोंपर्यंत देशस्थिति सुधारली, असे कधीहि म्हणतां येणार नाही."
 देश म्हणजे काय, लोक म्हणजे कोण हें लोकमान्यांच्या मनांत त्यांनी केसरीसाठी लेखणी उचलण्याच्या आधीच निश्चित झालें होतें.
 देश म्हणजे शेतकरी, देश म्हणजे काबाडकष्ट करणारी जनता. शेतकरी हा राष्ट्राचा आत्मा! चाळीस वर्षे हें सत्य ते हिंदी समाजाला शिकवीत होते. ते अद्वैत