चरित्र-रूपरेषा । २१३
ताईमहाराजप्रकरणाच्या अग्निदिव्यांतून त्यांना याच काळांत जावे लागलें. बाबामहाराज हे त्यांचे मित्र. त्यांच्या पत्नी ताईमहाराज. मृत्युसमयीं बाबामहाराजांनी टिळकांना आपल्या मिळकतीचे विश्वस्त नेमलें. त्याअन्वये टिळकांनी जगन्नाथमहाराज यांना ताईमहाराजांच्या मांडीवर दत्तक दिले; पण यांतून वाद व खटले निर्माण होऊन टिळकांच्या आयुष्याचें एक तप यांत खर्ची पडलें. यांतच बाईंवर हात टाकल्याचा आरोप त्यांच्यावर आणून त्यांना आयुष्यांतून उठविण्याचा सरकारने घाट घातला होता; पण त्यांतून ते मुक्त होऊन अधिकच तेजाने तळपूं लागले. पुढे १९१५ साली प्रीव्हि कौन्सिलमध्ये त्यांच्यासारखा निकाल होऊन या प्रकरणावर शेवटचा पडदा पडला.
१९०८ साली टिळकांना राजद्रोहाची दुसरी शिक्षा झाली. ही सहा वर्षांची होती. ती संपवून १९१४ साली ते सुटून आले. या वेळी ब्रह्मदेशांतील मंडाले या गावीं त्यांना ठेवलें होतें. तेथेच त्यांनी 'भगवद्गीतारहस्य' हा विख्यात ग्रंथ लिहिला; आणि हिंदुधर्मांत फार मोठें परिवर्तन घडवून आणले.
टिळक सुटून आले तेव्हा पहिले महायुद्ध सुरू झालें होतें. त्यांचा राष्ट्रीय पक्षहि निस्तेज व विस्कळित झाला होता. ही सर्व परिस्थिति ओळखून टिळकांनी इंग्रज सरकारला युद्धकार्यांत साहाय्य करण्याचें ठरवून लष्करभरतीचा उपदेश सुरू केला. इंग्लंड संकटांत आलें ही हिंदुस्थानला सुसंधि आहे, याच वेळीं कांही स्वराज्याचे हक्क मिळाले तर मिळतील, असें त्यांचें धोरण होतें.
त्यांच्या सहा वर्षांच्या अनुपस्थितींत काँग्रेस मवाळांच्या हातीं गेली होती, पण १९१५ साली टिळकांनी आपल्या अनुयायांसह काँग्रेस प्रवेश केला; आणि लवकरच तिच्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केलें. पुढच्या सालीं सुप्रसिद्ध होमरूल लीगची- हिंदी स्वराज्यसंघाची- त्यांनी स्थापना केली; आणि सर्व हिंदुस्थानभर दौरा काढून मरगळलेल्या चळवळीला पुन्हा तेज आणलें. अर्थात् यांमुळे त्यांच्यावर पुन्हा सरकारची वक्रदृष्टि झाली व त्यांच्यावर पुन्हा खटला भरण्यांत येऊन त्यांच्याकडुन पन्नास हजारांचा जामीन मागण्यांत आला; पण या वेळीं न्यायदेवता जरा जागी होती. हायकोर्टाने खालच्या कोर्टाचा निकाल फिरवून त्यांना मुक्त केलें.
१९१६ सालची लखनौची काँग्रेस दोन कारणांनी महत्त्वाची ठरली. या अधिवेशनांतच "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व मी तें मिळवीनच" हा महामंत्र त्यांनी उच्चारला; आणि लखनौलाच हिंदु-मुस्लिम करार घडवून आणून त्यांनी स्वराज्याच्या चळवळीसाठी एकसंध फळी निर्माण केली.
१९१७ साली स्टेटसेक्रेटरी माँटेग्यू यांनी ब्रिटिश सरकारचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यांत, हिंदुस्थानाला जबाबदारीचें स्वराज्य देऊन साम्राज्यांतील एक भागीदार करणें हें ब्रिटिश सरकारचें धोरण आहे, असें आश्वासन दिलें होतें. सरकारी धोरणांतील हें परिवर्तन फार मोठें होतें. 'स्वराज्य' हा शब्द उच्चारणें हाच पूर्वी