व्यक्तिमत्त्व । २०७
आहे व पाश्चात्त्य सुधारणांचा अंगीकार केल्यावांचून आमचा निभाव लागणार. नाही हें 'सुधारकाच्या' पहिल्या अंकांतच त्यांनी सांगितलें आहे. तेथे त्यांनी तर्कनिष्ठ पद्धतीचाच अवलंब केला आहे. समाजांतील भिन्न वर्गांत विषमता वाढत गेली तर त्याचे भयंकर परिणाम होतील, हें तरुण सुशिक्षितांस पटवून देतांना त्यांनी इतिहासांतील विपुल प्रमाणें दिली आहेत. इंग्रजी राज्याची उलट बाजू आगरकर दाखवूं लागले की, त्यांच्या प्रतिपादनशैलीचे सर्व गुण प्रकट होतात. रेल्वे-कंपन्यांचा कारभार, अफूचा व्यापार, इंग्रजांनी साम्राज्यविस्तारासाठी केलेली युद्धे, त्यांपायी भारतीयांची झालेली अन्नान्नदशा यांविषयी आगरकरांनी केलेलें कोणतेंहि विवेचन काढून पाहा. इतिहास, अर्थशास्त्र, राजनीति इत्यादि शास्त्रांतील अचूक आधार, अचूक प्रमाणे देऊन आपलें प्रतिपादन भक्कम पायांवर उभे करण्याची त्यांनी कोशिस केली आहे, असेंच दिसून येईल.
व्याजोक्ति
उपरोध, उपहास, व्याजोक्ति, वक्रोक्ति हा कांही आगरकरांच्या लेखणीचा प्रधान गुण नव्हे. तें लेणें विष्णुशास्त्री यांच्या लेखणीचें आहे; पण अंध, जीर्ण, नादान अशा हिंदु समाजाबद्दलचा संताप अनावर झाला की, आगरकरांच्या लेखणीला तितकीच उपरोधाची धार चढू लागते व तिचा तिखटपणा तसाच तीव्र होतो. बालविवाहास कायद्याने बंदी केली तर आई-बापांच्या स्वातंत्र्याला बाध येईल, असा मुद्दा कोणी मांडीत. त्याबद्दल लिहितांना आगरकर म्हणतात, "वाहवा! हें आई- बापांचें स्वातंत्र्य, हा त्यांचा अधिकार! पोटच्या पोरीचें कुंकूं पुसण्याचा अधिकार, मुलाच्या बायकोस नापितापुढे बसविण्याचा अधिकार! सुशिक्षित म्हणविणाऱ्यांनी या हक्कासाठी आक्रोश करावा या विस्मयजनक देखाव्याची कल्पना करणें देखील कठीण आहे!" जुन्या धर्मशास्त्रकारांचा अभिमान बाळगणे, त्यांना संभाळून घेणें, हें टिळकांचें धोरण; तर जेथे संधि मिळेल तेथे त्यांच्यावर प्रहार करणें ही आगरकरांची वृत्ति. डोंगरीच्या तुरुंगाचें वर्णन करतांना ते म्हणतात, "तुरुंगांत बायको आली म्हणजे तिचे केस कापतात व कांकणें पिचवितात. तरी तुरुंगाचे कडक कायदे अपराधी बायकांची डोकी केवळ संन्याशाचे असोले गोटेच होऊं देत नाहीत. निरपराधी बायकांस तसली विद्रूपता आणणें हें आमच्या सदय महर्षीच्या धर्माकडे सोपविले आहे.
उपमा-दृष्टान्त
कल्पनाशक्तीचा खेळ आगरकरांच्या लेखनांत फारसा दिसून येत नाही. तरी मधून मधून कांही उपमा- दृष्टान्तादि रम्य अलंकार त्यांच्या निबंधांतून दृष्टीस पडतात व तेवढाच विरंगुळा वाटतो. पाश्चात्य विद्येला त्यांनी दुर्बिणीची उपमा दिली आहे ती अत्यंत समर्पक आहे. दुर्बिणींतून आकाशस्थ गृहगोलांचें, तारकांचें सम्यक् स्वरूप कळतें तसें नुसत्या दृष्टीने कळत नाही. त्याचप्रमाणे मनुष्य-