२०६ । केसरीची त्रिमूर्ति
लेखनशैली
आगरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे सर्व गुणविशेष त्यांच्या लेखनांत पदोपदीं. दिसून येतात. त्यांची लेखनशैली याच गुणविशेषांनी नटलेली आहे. अत्यंत प्रबल असा आत्मप्रत्यय त्यांच्या ठायीं असल्यामुळे त्यांचीं विधानें ठाम, निश्चित व निःसंदिग्ध अशी असतात. त्यांत साशंकता, डळमळ, किंवा चाचरेपणा कधीहि दिसणार नाही. ठामपणाचा, निश्चयाचा हा गुण केसरीच्या त्रिमूर्तीपैकी प्रत्येक मूर्तीच्या लेखनांत आढळतो. कारण तिघांची अहंवृत्ति सारखीच तेजस्वी होती. आपण जगाला शिकविण्यासाठीच जन्माला आलों आहों, असा आत्मिक हुंकार यांपैकी प्रत्येकाच्या ठायी होता. त्यामुळे त्यांच्या निबंधांना उपनिषत्कर्त्या ऋषीचें तेज प्राप्त झालेलें आहे. या तिघांचे निबंध म्हणजे महाराष्ट्राचीं व भारताचीं उपनिषदेंच आहेत. हे तिघेहि तत्त्ववेत्ते निबंधकार होते. त्यांनी आपल्या लेखणीने महाराष्ट्रांत नवी सृष्टि निर्माण केली. ती सृष्टि निर्माण करण्याइतकी प्रज्ञा, इतकी सर्जनशक्ति, आणि इतकें वाणीचें प्रभुत्व त्यांच्या ठायीं निश्चित होतें. त्यामुळे उपनिषत्कर्त्या ऋषींच्या वाणींत जो दृढपणा, निश्चितपणा, आणि जोम दृष्टीस पडतो तोच यांच्या वाणींतहि प्रत्ययास येतो. "सचेतन व अचेतन सृष्टीचा दास मी नाही, तर तिला दास करण्याचा अधिकार मला आहे, असा विचार मनुष्याच्या अंतःकरणांत वागूं लागला म्हणजे त्याच्या खऱ्या सुधारणेस प्रारंभ होतो." "म्हणून कोणी तरी अस्तित्वांत असलेल्या लोकमतांतील दोषस्थले दाखविण्याचें व समाजांतील बहुतेक लोकांना अप्रिय, परंतु पथ्यकारक असे विचार त्यांच्यापुढे आणण्याचें काम करण्यास तयार झालेच पाहिजे. असें करण्यास लागणारें धैर्य ज्या समाजांतील कांही व्यक्तींच्या सुद्धा अंगी नसेल त्या समाजांनी वर डोके काढण्याची आशा कधीहि धरूं नये." "मुसलमान लोकांनी येथे अनेक शतकें राज्य केलें, पण त्यांच्या दीर्घकालीन अमलाने आम्ही जितके डबघाईस आलो नाही तितके या शतसांवत्सरिक ब्रिटिश अमलाने आलों आहों. अशा तऱ्हेची सिद्धान्तवाक्यें आगरकरांच्या निबंधांत सर्वत्र आढळतात. त्यांतूनच त्यांचा आत्मप्रत्यय स्पष्ट दिसून येतो.
बुद्धीला आवाहन
पण असा पुरेपूर आत्मप्रत्यय असला तरी आपलीं वचनें आपलीं विधानें लोकांनी प्रमाण मानावी, असा चुकून सुद्धा विचार आगरकरांच्या मनांत आला नाही. साधार, सप्रमाण, तर्कशुद्ध प्रतिपादन करून लोकांच्या बुद्धीला आवाहन करावें, त्या बुद्धीला पटवून द्यावें हेंच धोरण आगरकरांचें होतें. लो. टिळकांची हीच वृत्ति होती. प्राचीन धर्माचें प्रतिपादन आता पाश्चात्त्य पद्धतीने केलें पाहिजे, जुन्या काळच्या मन्वादि धर्मशास्त्रकारांप्रमाणे नुसतीं विधानें करून भागणार नाही, असें त्यांनी गीतारहस्यांत मुद्दाम सांगितलें आहे. आगरकरांची हीच पद्धति होती. हिंदुस्थानचा अधःपात, आमचे भ्रांत सामाजिक विचार, घातक रूढि यांमुळे झाला