Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०८ । केसरीची त्रिमूर्ति

सुधारणेची दूरची, भविष्यकाळची दिशा पाश्चात्त्य विद्यारूप दुर्बिणींतून जशी सम्यक् आकळतां येईल तशी त्या विद्येच्या अभावी येणार नाही. स्वतःच्या अंगीं मुळीच कर्तृत्व नसतांना दर पावलास पूर्वजांचें गुणगान करणाच्या जीर्णवादी लोकांना त्यांनी पराक्रमी पुरुषाच्या बहुभाष विधवेची उपमा दिली आहे. पतिनिधनामुळे नवीन संतान होण्याची तिला आशा नसते. त्यामुळे आमचे पुरुष असे होते, तसे होते असे नुसतें गुणगान ती करीत बसते. तसेच हे लोक स्वतःच्या हातून पराक्रम होईल हो आशा त्यांना नसते. म्हणून मग ते पूर्वजांची स्तोत्रं गात बसतात.
प्रौढ भाषा
 आगरकरांची भाषा प्रौढ व संस्कृतप्रचुर आहे. केव्हा केव्हा तिची संस्कृत- प्रचुरता जास्तच जाणवते हें खरें पण तें अपवादात्मक प्रसंगी. आणि तशी झाली तरी त्यांच्या अंतरीचा भावार्थ, त्यांचा आवेश, त्यांची तळमळ, प्रतिपक्षाविषयी त्यांच्या मनांत असलेली चीड, त्यांचा संताप, त्यांचा स्वाभिमान त्यांची सहृयता हे सर्व भाव उत्तम प्रकट व्हावें असा ओघ तिला आलेला असतो. त्यांची वाक्यें अनेक वेळा दीर्घ व पल्लेदार झालेली दिसतात. केव्हा केव्हा तीं चौदा-पंधरा ओळींपर्यंत पसरतात. तरीहि अर्थौघ कोठे कुंठित झाला, असें वाटत नाही. त्या ओघाच्या वेगामुळे प्रसन्नता कोठे गढूळली आहे, असें होत नाही. त्यांचा संताप अनावर झाला आहे, आवेश तीव्र झाला आहे आणि विचारांचा ओघ आता पर्वताचे कडे भेदून जाणार आहे, असें वाटून मनाला आनंदच होतो.
 'सुधारका'वर अनेक आपत्ति आल्या, लोकांनी त्याच्यावर दारुण आघात केले. तेव्हा आता 'सुधारक' बंद पडणार, असें कोणी म्हणूं लागले, तर त्यांना आगरकर निर्भयपर्णे बजावीत की, "टाकांतून अर्थबोधक अक्षरें काढण्याचें सामर्थ्यं असेल व ती वाचण्यास निदान एक तरी इसम तयार असेल तोंपर्यंत समाजाला भिऊन स्वस्थ बसण्याचें स्त्रैणकर्म 'सुधारका'ला स्पर्श करू शकणार नाही."
 आगरकरांच्या सर्वं व्यक्तिमत्त्वाचा आशय या वाक्यांत समावलेला आहे या व्यक्तिमत्त्वाच्या आविष्कारामुळे मराठी भाषा समृद्ध, संपन्न झाली, तिला एक आगळें तेज व सौंदर्य प्राप्त झालें आणि 'सुधारका'च्या पहिल्या अंकांत आगरकरांनी थोर समाजसुधारकांविषयी स्वतःच म्हटल्याप्रमाणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वांतून प्रकट झालेल्या त्यांच्या चारित्र्यामुळे, त्यांच्या वर्तनामुळे, जगाचें हित व त्यांच्या जन्माची सार्थकता झाली.