व्यक्तिमत्व । २०३
आम्हांला आहे, असें ते निर्भयपणे सांगत, आणि अशा रीतीने कोणत्याहि प्रकारच्या प्रामाण्याच्या मुळावरच कुठार घालीत.
क्रांतिवाद
यामुळेच आगरकर पूर्णपणें क्रांतिवादी झाले होते. क्रांतिवाद व पुनरुज्जीवनवाद हे जगांतले दोन सनातन पंथ आहेत. सुधारणा दोन्ही पंथांना हवी असते; पण जुनेच घासून-पुसून त्याला नवें रूप द्यावें, त्यांतच अवश्य तो बदल करून त्याचा स्वीकार करावा, असे पुनरुज्जीवनवादी म्हणतात (अलीकडे अंधश्रद्धेने जुन्याचें समर्थन करणें असा पुनरुज्जीवन याचा अर्थ झाला आहे. तो बरोबर नाही) क्रांतिवादी जुन्याची पाळेंमुळें खणून तेथे सर्वस्वीं नवीनाची स्थापना करावी, अशा वृत्तीचा असतो. आगरकर प्राधान्याने क्रांतिवादी होते. विष्णुशास्त्री, टिळक हे प्राधान्याने पुनरुज्जीवनवादी होते. जुन्या स्वरूपांत चातुर्वर्ण्य किंवा विवाहविषयक रूढि टिकून राहव्या असें त्यांना वाटत नसे, पण जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्य त्याज्य मानले तरी गुणकर्मनिष्ठ चातुर्वर्ण्य अवश्य मानावें असें ते म्हणत. चातुर्वर्ण्य मुळांतच नष्ट करून टाकावें, अशी आगरकरांची विचारसरणी होती. विवाहाच्या बाबतींत असेंच होतें. बालविवाह टिळकांना मान्य नव्हता, पण सुधारणा सुचवितांना, मुलीचे लग्न पंधराव्या वर्षानंतर करावें, इतक्याच मर्यादेपर्यंत टिळक जातात, पण आगरकर एकदम पाश्चात्त्य लोकांप्रमाणे आपण प्रेमविवाह रूढ करावे व जो प्रेमविवाह नाही तो बालविवाहच होयं असें सांगून, प्रणयबद्ध तरुण स्त्री-पुरुषांच्या प्रणयांतील उत्कट आनंदाचें मुक्त मनाने वर्णन करतात. टिळकांच्या बाबतींत हें कल्पनेला सुद्धा सहन होणार नाही.
नास्तिक
मिल्ल, स्पेन्सर यांचा अभ्यास, बुद्धिप्रामाण्य व रूढ हिंदु धर्माची आलेली घृणा याचीच परिणति होऊन आगरकर अज्ञेयवादी आणि खरे म्हणजे नास्तिक झाले. जगाचा संसार, न्यायाने, सत्याने आणि सर्व भूतांच्या कल्याणासाठी चालविणारा कोणी परमेश्वर आहे यावर त्यांची श्रद्धा नव्हती. मिल्ल, स्पेन्सर यांचा टिळकांनीहि अभ्यास केला होता, आणि आरंभी न्या. रानडे यांच्याशी झालेल्या वादांत त्यांनी आगरकरांचाच पक्ष घेतला होता; पण पुढे वेदान्त व प्राचीन भारतीय परंपरा यांचा अभ्यास जसजसा वाढू लागला तसतसे ते पूर्ण आस्तिक व श्रद्धासंपन्न झाले. आगरकर मान्न शेवटपर्यंत अज्ञेयवादी व नास्तिकच राहिले. यामुळे देवदेवता, धर्मकल्पना, कुटुंबसंस्था यांची मूलगामी चिकित्सा ते करीत व तो धर्म आणि त्या देवता यांची चीरफाड करून त्यांची आतडी नि कातडी आपल्यासमोर धरीत. धर्मकल्पना, देवकल्पना या मुळांत पिशाच- कल्पनेपासून उदय पावल्या आहेत, आणि देव हें पिशाचाचेच रूपांतर आहे, असे मत ते मांडतात; आणि असे तात्त्विक सिद्धान्त सांगून स्वस्थ न बसतां शंकर या देवतेचें अगदी प्राकृत वर्णन करून ही