Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०२ । केसरीची त्रिमूर्ति

यांचा भर असे. आणि शत्रूवर तसा भडिमार केल्यावर त्याच्याकडे विष्णुशास्त्री मिस्किलपणे पाहत उभे आहेत, असें चित्र मनापुढे येतें. लो. टिळक स्थितप्रज्ञ वेदान्ती होते. सुख-दुःख, राग-द्वेष त्यांनी जिंकले होते. म्हणून लहान, आटोपशीर वाक्यांत वस्तुस्थिति सांगून ते अन्याय व जुलूम यांची कल्पना आणून देत. "मनांत रागद्वेष न आणतां, कर्तव्य-बुद्धीने तूं लढ" असें श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलें. त्याला तें कितपत जमले हा प्रश्नच आहे; पण टिळक तसे लढत आहेत, असें चित्र मनापुढे येतें, हें खरें आहे. जनतेंत संताप, असंतोष, चीड निर्माण व्हावी हें त्यांचें उद्दिष्ट होतें; आणि त्या भावनांचा प्रक्षोभ निर्माण करण्यासाठी अवश्य तो संताप व चीड तेहि व्यक्त करीत; पण हें सर्व कर्तव्य-बुद्धीने, कर्मयोगी वृत्तीने चालले आहे, असें वाटावें, अशी त्यांच्या लेखनाची, भाषणाची बैठक असे. आगरकर मात्र जीवनाच्या मूळ कंदापासून उन्मळून लिहीत बोलत आहेत असें वाटतें. सनातनी लोकांविरुद्ध, ब्रिटिशांविरुद्ध, ते संतापून लिहितात, तेव्हा ते त्या संतापाच्या आहारी गेले आहेत असें वाटतें.
 बालविवाह, त्यापायी मुलींच्यावर होणारे अत्याचार, अस्पृश्यांची होत असलेली मानखंडना, विधवा स्त्रियांचें सक्तीने होणारें वपन, सनातन्यांचे ढोंगी सोवळें-ओवळें, हें पाहून त्यांचा मनःक्षोभ अनावर होई, आणि मग ते हिंदु समाजावर मर्मभेदी टीका करीत. तुम्ही नादान आहांत, भेकड आहांत, तुमचा धर्म अमंगल आहे, बीभत्स आहे, निर्दय आहे, वंचक आहे, असे शब्द त्यांच्या लेखणीतून उतरत, आणि ज्या हिंदु धर्माने हीं अनन्वित कृत्यें करविली त्याची पाळेमुळे खणून काढून विचारकुंडांत पेटलेल्या अग्नींत त्यांची आहुति देण्यास ते सिद्ध होत; आणि इतका भडिमार करूनहि हा समाज सुधारण्याची चिन्हें दिसली नाहीत की, अतिशय निराश होऊन हा हिंदु समाज नष्ट होऊन गेला तरी बरें, असे आततायी उद्गार ते काढीत. इतकी कमालीची तीव्रता व उत्कटता विष्णुशास्त्री व टिळक यांच्या भाषेत क्वचितच व्यक्त होते.
बुद्धिप्रामाण्य
 पण असें भावनांचें वर्चस्व मनावर असूनहि आगरकर कमालीचे बुद्धिप्रामाण्यवादी होते. केवळ भावनाप्रेरित असें लेखन त्यांनी केव्हाहि केलें नाही. कॉलेजमध्ये असतांनाच त्यांनी मिल्ल व स्पेन्सर ह्यांच्या ग्रंथांचा अभ्यास केला होता. त्याचे त्यांच्या मनावर खोल संस्कार झाले होते, आणि त्यामुळेच ते प्रखर बुद्धिवादी झाले होते. त्यांच्या आधी महाराष्ट्रांत निर्माण झालेले जांभेकर, लोकहितवादी, रानडे, भांडारकर, तेलंग हे जे थोर पुरुष यांच्यांत अंधश्रद्धावादी कोणीच नव्हते; पण जुन्या धर्मशास्त्रांतील अनुकूल वचनें शोधून काढून त्यांच्या आधारें परिवर्तन घडवून आणावें असें त्यांचें धोरण होतें. आगरकरांना हें मुळीच मान्य नव्हतें. एका ऋषी- विरुद्ध अशा रीतीने दुसरा ऋषि उभा करण्यांत कांही अर्थ नाही, असें ते म्हणत. त्या ऋषींना जेवढी प्रज्ञा होती, बुद्धि होती ज्ञान होतें तेवढेंच, किंवा थोडें अधिकच