२०४ । केसरीची त्रिमूर्ति
देवता म्हणजे एक महापिशाचच आहे, असें ते सांगून टाकतात. लोकमान्य टिळकांना देवतांचें हें मूळ स्वरूप मान्य नसेल असें म्हणतां येणार नाही; पण त्या आधारें सध्या समाज ज्यांना पूज्य मानतो त्या शंकर, गणपति, ब्रह्मा, विष्णु या देवतांची व एकंदर मूर्तिपूजेची अशी चीरफाड त्यांनी कधी केली नाही. मात्र घातक श्रद्धा जपून ठेवाव्या अशी त्यांची वृत्ति नव्हती. नाही तर हजारो वर्षे अखिल भारतांत मान्य झालेल्या शंकराचार्यांच्या 'गीताभाष्यां'तील मतें सांप्रदायिक, एकदेशी व आग्रही ठरवून त्यांनी ती सर्वथैव त्याज्य मानली नसती. भागवतांत कर्मयोगाचें महत्त्व कमी करून भक्तीला प्राधान्य दिलें आहे, हें टिळकांना आक्षेपार्ह वाटलें. तरी त्यांनी टीका इतकीच केली की, "भक्तीचें माहात्म्य सांगण्यासाठी, भागवतपुराण ही पुराणपोळी मागाहून बनविली आहे." श्रीकृष्णाच्या चरित्रांतील गोपींच्याबरोबर त्याने केलेला शृंगार हा भाग विसंगत वाटतो, पण त्यावर "हा भाग मागाहून घातलेला आहे" इतकाच अभिप्राय टिळक देतात; पण आगरकर त्याला एकदम शिनळ, जारशिरोमणि ठरवून मोकळे होतात. परिवर्तन, स्थित्यंतर सर्वांनाच हवें होतें; पण जुन्याचा त्याग करतांना तो संभाळून करावा, आदराने करावा, त्यावर अक्षता टाकाव्या अशी टिळकांची वृत्ति होती. तर तें उचलून नाल्यांत फेकून द्यावें ही आगरकरांची वृत्ति. एक पुनरुज्जीवनवाद तर एक क्रान्तिवाद! दोन्ही समाजाला सारखेच उपयुक्त.
पाश्चात्त्य आदर्श
आगरकरांनी पांडित्य जोडलें तेंहि याच धोरणाने. पुनरुज्जीवन त्यांना मान्यच नसल्यामुळे संस्कृत विद्येच्या ते वाटेसच गेले नाहीत. वेद, उपनिषदें, महाभारत, रामायण यांचा आधार ते कधी घेत नाहीत. या ग्रंथांतील अवतरणें ते कधी देत नाहीत. विष्णुशास्त्री, टिळक यांच्या निबंधांच्या प्रारंभी पुष्कळ वेळा संस्कृत वचनें दिसतात. आगरकरांनी चुकून सुद्धा प्रारंभीं असें वचन दिलेलें नाही. संस्कृत वचनांच्या आधारे कांही सांगावें, हें त्यांच्या वृत्तींतच नव्हतें. त्यांचे आधार म्हणजे मिल्ल, स्पेन्सर, कोंट. ग्रीस, रोम, रशिया, इंग्लंड, फ्रान्स ह्या देशांचे इतिहास त्यांनी बारकाईने पाहिले होते. क्वेकर, प्रोटेस्टंट ह्या धर्मपंथांचा आधार ते वारंवार घेतात. फ्रेंच क्रांति, लूथरकृत धर्मंक्रांति, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध ह्यांचें सखोल ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतलें होतें; आणि त्या आधारांनीच ते आपल्या निबंधांची सजावट करीत; पण वेद, उपनिषदें, रामायण, महाभारत, भर्तृहरि यांच्यांतून जीवनरस घेऊन आपलें साहित्य फुलवावें असें त्यांना कधीच वाटले नाही. टिळकांना पाश्चात्य विद्या, पाश्चात्त्य विज्ञान, पाश्चात्त्य लोकायत्त संस्था, आगरकरांच्या- इतक्याच, किंबहुना जास्तच महत्त्वाच्या वाटत; पण जीवनरसाचा अमृतकुंभ म्हणजे वेदोपनिषदेंच होत अशी त्यांची धारणा होती. आगरकर मात्र पाश्चात्त्य पंडित, पाश्चात्य ग्रंथ, पाश्चात्त्य तत्त्ववेत्ते, त्यांचें तत्त्वज्ञान या प्रवाहांतच अखेरपर्यंत मज्जन करीत राहिले होते.