-७-
व्यक्तिमत्त्व |
करुणा, मानवता
आगरकरांची मूळ प्रेरणा मानवतेची, करुणेची, भूतदयेची होती असें दिसतें. विष्णुशास्त्री, टिळक, सावरकर यांची प्रेरणा राष्ट्रोद्धाराची, स्वातंत्र्याची, होती. दीन, दलित जनता, शूद्र, अस्पृश्य, स्त्रिया यांचा उद्धार व्हावा याची आच त्यांना नव्हती असें नाही; पण तसें न केल्यास समाज संघटित होणारं नाही, एकजूट साधणार नाही, राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यांत ब्रिटिशांविरुद्ध अखिल भारताची आघाडी उभारतां येणार नाही, ही त्यांना मूळ चिंता होती. अखिल जनता जागृत करण्यासाठी त्यांनी आपापल्या परीने प्रयत्न केले ते राष्ट्रसंघटनेच्या हेतूने. आगरकरहि राष्ट्रनिष्ठ व स्वातंत्र्यवादीच होते, पण समाजसुधारणेचा त्यांचा जो आग्रह होता, त्यासाठी त्यांना जी पराकाष्ठेची तळमळ वाटे तिच्या मागे दया, करुणा ही प्रेरणा फार प्रभावी होती. म्हणजे त्यांचें चित्त गलबलून येत असें तें बालविधवा, उपेक्षित स्त्रिया, दलित जनता यांना भोगाव्या लागणाऱ्या यातना, कष्ट, जुलूम यांमुळे. विषमता, अन्याय हा मानवतेविरुद्ध अन्याय आहे, याचा त्यांना संताप येत असे आणि तो अन्याय दूर झाला पाहिजे, ती विषमता नष्ट झाली पाहिजे, हा त्यांचा पहिला उमाळा असे. ते लेखणी उचलीत ती त्या प्रेरणेने.
तीव्र भावना
यामुळेच आगरकर आपल्या दोन थोर सहकाऱ्यांपेक्षा जास्त भावनाप्रधान झाले होते. विष्णुशास्त्री व टिळक यांच्या वृत्तींत व लेखनांत भावनांचा ओलावा तसा फार कमी, पांडित्याचा प्रकर्ष करून, इतिहासांतील प्रमाणांचा वर्षाव करून, उपरोध, उपहास, या शस्त्रांनी प्रतिपक्षाला जमीनदोस्त करण्यावर विष्णुशास्त्री