४ । केसरीची त्रिमूर्ति
स्थापून त्यांनी निर्वाहाचा प्रश्न सोडविला होता. १८७८ च्या जानेवारीपासून
'काव्येतिहाससंग्रह' हें मासिकहि निघू लागलें होतें. निबंधमालेचा खपहि बरा होता. वडिलांच्या नाराजीचा संभवहि आता नाहीसा झाला होता. त्यामुळे तो निश्चय पक्का करून १८७९ साली विष्णुशास्त्री मे महिन्यांत सहा महिन्यांची रजा घेऊन पुण्यास आले व तेथूनच सप्टेंबर महिन्यांत त्यांनी नोकरीचा राजीनामा
पाठवून दिला.
नोकरीची बेडी तोडल्यावर निबंधमाला, चित्रशाळा व काव्येतिहाससंग्रह या विविध उद्योगाच्या भरीला त्यांनी नवे दोन कार्यारंभ केले. १ जानेवारी १८८० रोजी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली; आणि पुढच्या वर्षी आर्यभूषण छापखाना स्थापून त्यांनी 'केसरी' व 'मराठा' हीं पत्रे सुरू केलीं. या कामी त्यांना आगरकर, टिळक, नामजोशी, आपटे, यांसारखे खंदे सहकारी मिळाले होते. त्यामुळे त्यांचा हुरूपहि वाढला होता. तेव्हा 'निबंधमाला' परिसमाप्त करून आता 'ग्रंथमाला' सुरू करावयाची असें त्यांनी ठरविलें. मालेच्या ८४ व्या अंकांत त्यांनी लिहून टाकलें की, "हें महासत्र संपवून आम्ही आता अवभृथ स्नानास मोकळे होणार." त्याप्रमाणे त्यांनी अवभृथ स्नान आचरिलेंहि होतें. त्यानंतर दुसऱ्या महासत्राच्या तयारीला त्यांनी प्रारंभहि केला होता; पण नियतीची इच्छा निराळी होती. १६ जानेवारी १८८२ या दिवशीं फोटोला बसले असतांना ऊन्ह लागल्याचें निमित्त होऊन ते घेरी येऊन खाली पडले. तेव्हापासून त्यांना ताप येऊ लागला व तेंच दुखणें बळावून १७ मार्च १८८२ रोजी ग्रंथयज्ञ तसाच सोडून ते परलोकी गेले.
१८७२ ते १८८२ हीं दहाच वर्षे विष्णुशास्त्री यांना त्यांच्या जीवित कार्यासाठी लाभली; पण तेवढ्या अवधीत 'विष्णुशास्त्रीयुग' अशी महाराष्ट्राच्या इतिहासांतील त्या कालखंडावर मुद्रा उठवून ते गेले. या त्यांच्या अलौकिक यशाचें रहस्य काय ?
पुढील प्रबंधांत तेंच विशद करावयाचें आहे.