पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


चरित्र-रूपरेषा

 विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म २० मे १८५० रोजी पुणे येथे झाला. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हे प्रापंचिक व्यवहारांत फारसें लक्ष घालीत नसत. त्यामुळे विष्णुशास्त्री यांचें प्राथमिक शिक्षण आजोबा हरिपंत यांच्याजवळच झालें. १८६६ साली मॅट्रिक होऊन ते पूना कॉलेजांत गेले. त्याच्या आधीच्या वर्षीच त्यांचा विवाह झाला होता. पूना कॉलेज हें १८६८ सालीं येरवड्या- जवळच्या नव्या इमारतींत गेलें, व त्याला डेक्कन कॉलेज हें नांव मिळाले. १८७२ सालीं तेथून ते बी. ए. झाले व १८७३ च्या प्रारंभींच पूना हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करूं लागले.
 १८७४ च्या जानेवारींत निबंधमालेचा पहिला अंक निघाला. १८६८ सालापासूनच विष्णुशास्त्री शालापत्रकांत लिहू लागले होते. ते बी. ए. झाल्यावर कृष्णशास्त्री यांनी त्याच्या संपादनाची सर्वच जबाबदारी चिरंजीवांवर टाकली. 'संस्कृत कविपंचक' ही लेखमाला यांनी शालापत्राकांतूनच लिहिली. शालापत्रकांत मिशनरी व सरकार यांवर विष्णुशास्त्री यांनी फार जहाल टीका केली. शिवाय त्याचे अंक वेळेवर निघेनात; म्हणून १८७५ साली सरकारने तें पत्र बंद केलें. पण त्याआधीच निबंधमालेला प्रारंभ झाला होता. त्यामुळे शास्त्रीबुवांची लेखणी थांबण्याचा प्रश्नच नव्हता. ती थांबली नाही तसाच तिचा स्वभावहि बदलला नाही. उलट सरकार व मिशनरी यांच्यावर ती जास्तच कठोर प्रहार करूं लागली. त्यामुळे पहिली समज म्हणून सरकारने १८७७ सालच्या अखेरीस विष्णुशास्त्री यांची रत्नागिरीस बदली केली. तेथे ते दीड वर्ष राहिले. दरम्यान १८७८ सालच्या मे महिन्यांत त्यांचे वडील कृष्णशास्त्री हे मृत्यु पावले. या वेळेपासूनच नोकरी सोडून देण्याचा विचार त्यांच्या मनांत घोळू लागला होता. १८७७ साली 'चित्रशाळा'