१९४ । केसरीची त्रिमूर्ति
येणाऱ्या मालावर शेकडा पांच जकात बसविण्याचें ठरविलें होतें. ही जकात म्हणजे हिंदुस्थानातील लोकांवर अप्रत्यक्ष करच होता; पण त्यांतहि मोठा अन्याय म्हणजे ब्रिटिश गिरणी मालकांच्या फायद्यासाठी त्यांच्या कापडावरील जकात माफ करणें हा होय. मँचेस्टरचें कापड इकडे येत होतें, त्यावर जकात बसविली तर तिथल्या गिरणीवाल्यांचा रोष पत्करावा लागला असता. आणि तें ब्रिटिश सरकारला परवडणारे नव्हते. हिंदुस्थानचे नुकसान झालें तरी चालेल, पण ब्रिटिश कारखानदारांचें व व्यापाऱ्यांचे नुकसान मुळीच होता कामा नये, हेंच त्याचें धोरण होतें. मग तूट भरून काढण्यासाठी प्राप्तीवरील कर वाढवण्याचा विचार सुरू झाला. हा विचार तर फारच घातक होता. "इंग्लिश अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी आधीच निष्कांचन झालेल्या प्रजेला असें पिळून काढणें अत्यंत लज्जास्पद आहे; सरकारच्या या वर्तनास काय नांव द्यावें तें आम्हांस समजत नाहीं," असे उद्गार आगरकरांनी काढले आहेत. तसेच आयात होणाऱ्या यंत्रसामग्रीवर व दगडी कोळशावर जकात बसल्यामुळे हिंदुस्थानांतील गिरणीवाल्यांचें कापड महाग होऊन त्यांना बाहेरील मालाशी चढाओढ करणें कठीण पडणार होतें. मँचेस्टरवाल्यांना ही जकात पडणार नव्हती; आणि कापडावरहि जकात नाही; म्हणजे त्यांचा दुहेरी फायदा होणार.
हिंदुस्थानांतील दारिद्र्याची मीमांसा करून व इंग्लंडच्या स्वार्थी धोरणावर टीका करून आगरकरांनी राज्यकर्त्यांना वारंवार इशारा दिला आहे की, अतिलोभ धरूं नका; नाही तर तुम्हांला हें राज्यच सोडून जावें लागेल. पूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अमर्याद लोभामुळे १८५७ सालचा प्रक्षोभ ओढवून घेतला, त्याचप्रमाणे ब्रिटिश राज्यकर्ते भरमसाठ कर वाढवून प्रजेत असंतोष वाढवीत आहेत; त्याचा परिणाम फार घातक होईल. दारिद्र्य असह्य झालें तर प्रजा बंड करून उठेल; आणि "इतक्या कष्टाने रचलेली इमारत ढासळल्यावांचून राहणार नाही", असें आगरकरांनी लिहिले आहे. "लोभमूलानि पापानि" हें वचन ध्यानांत ठेवा, असेंच त्यांच्या लेखाचें शीर्षक आहे.
(४) स्वावलंबन - अशी विपन्नावस्था आलेली असतांना, ती नाहीशी करून ऊर्जितावस्था आणण्यासाठी स्वावलंबन हाच सर्वोत्तम उपाय होय, असें आगरकरांनी प्रतिपादलें आहे. आपणच आपल्या भाग्याचे शिल्पकार आहोत; "नर करणी करे तो नरका नारायण हो जाय" हें हिंदी वचन लक्षांत ठेवून आपण दीर्घोद्योगाचा अबलंब करायला हवा, तरच आपली स्थिति सुधारेल व सर्व प्रकारचें सुखोपभोग आपल्याला मिळू लागतील, असें त्यांनी म्हटले आहे. सरकारचें नियंत्रण करण्याचें सामर्थ्य लोकांच्या अंगीं असले पाहिजे. सरकार जुलमी असणें किंवा नसणें, हें लोकांवर अवलंबून असतें. ज्यांना स्वातंत्र्याची खरी चाड असेल, ते योग्य संधि मिळतांच आपलें स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपड करतील. "इंग्लिश लोकांनी आमची संपत्ति नेली, आम्हांला गुलाम केलें, कंगाल केलें, असें रडगाणे गात बसण्यांत अर्थ नाहीं" म्हणून