१९२ । केसरीची त्रिमूर्ति
इंग्लिश लोकांच्या अनेक गुणांची आगरकरांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली असली, तरी त्यांचें राजकीय व आर्थिक धोरण अन्यायाचें आहे हें उघडपणें सांगणें आपलें कर्तव्य आहे असें ते मानीत. त्यांच्या चुका दाखवण्याचे काम आपण करावें, त्या सरकारने दुरुस्त केल्या तर ठीकच. नाही तर "प्रजेची दारुण दैन्यावस्था कोणत्याहि राज्यकर्त्यांस केव्हा तरी विघातक झाल्यावांचून राहत नाही" असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
अठराव्या शतकांत इंग्लिश लोकांच्या दृष्टीने हिंदुस्थानांतली परिस्थिति फार बिकट होती. तथापि अनंत हालअपेष्टा सोसून त्यांनी येथे आपली सत्ता स्थापिली. त्यांचा पराक्रम व त्यांची कर्तबगारी सध्या येथे राज्य करणाऱ्या लोकांत मुळीच नाही. उलट ते नादान, क्रूर व स्वार्थी असून, विलासीहि आहेत. त्यांना कित्येक सुखोपभोग मिळत असूनहि त्यांची इथल्या परिस्थितीबद्दल तक्रार असतेच; हिंदुस्थानला ते काळें पाणी म्हणजे अगदी वाईट देश म्हणतात. हिंदुस्थानांत नोकरी करणें म्हणजे हद्दपार केलेल्या मनुष्याप्रमाणे कष्टमय, दुःखमय जिणें कंठणें असें मानतात. अशा इंग्रज अधिकाऱ्यांना आगरकर विचारतात की, "हिंदुस्थानांत जर तुमचे एवढे हाल होतात, तर तुम्ही येथे येतां कशाला? इकडे आल्यानंतर तुम्हांला जर इथे राहणें असह्य वाटू लागतें, तर तुम्ही परत का जात नाही? येथे राज्य करणें जर तुम्हांला कठीण वाटत असेल, तर तें तुम्ही सोडून कां देत नाही? तुमच्या सुखासाठी इथल्या गरीब लोकांना कां पिळून काढतां?"
अफू व दारू यांच्या बाबतींत ब्रिटिश सरकारने जें दुटप्पी धोरण अवलंबिले होतें, त्यावर आगरकरांनी खूप ताशेरे झाडले आहेत. वास्तविक पाहतां हे दोन्ही मादक पदार्थ अपायकारक आहेत; पण तुलनेने पाहतां अफूपेक्षा दारूचे परिणाम जास्त घातक असतात. अल्प प्रमाणांत अफूचें सेवन केलें तर तें शरीराच्या आरोग्याला उपकारक ठरतें असेंहि एक मत आहे; पण ब्रिटिश सरकार इंग्लंडमध्ये तयार होणाऱ्या दारूचा खप हिंदुस्थानांत वाढविण्यास उत्तेजन देतें; कारण त्यामुळे ब्रिटिश व्यापाऱ्यांचा फायदा होतो. हिंदुस्थानांतील लोकांचें दारूचें व्यसन कमी करण्यासाठी इंग्लंडमधून येणाऱ्या दारूवर अधिक कर बसविणें अवश्य आहे, पण त्यामुळे ब्रिटिश व्यापाऱ्यांचें नुकसान होईल, म्हणून सरकार तसें करीत नाही. दारूपायीं आमचें वाटोळें झालें तरी चालेल, पण इंग्रजांचें नुकसान होतां कामा नये, म्हणून हिंदी लोकांच्या घशांत दारूच्या बाटल्या ओतायच्या, असें सरकारचें धोरण आहे. अफूच्या कमी घातक व्यसनापासून मात्र हिंदी लोकांची सुटका केलीच पाहिजे, असें सरकारला वाटतें. हिंदुस्थानांतून चीनमध्ये जी अफू जाते तिच्यामुळे हिंदुस्थानला आठ-नऊ कोटि रुपये फायदा होतो; पण हा व्यापार बंद करण्याचा सरकारचा विचार आहे. कारण अफू खाणें फार वाईट! त्यामुळे आर्थिक नुकसान झाले तरी पर्वा नाही, कारण तें नुकसान नेटिव्ह संस्थानांचे व हिंदुस्थान सरकारचें होतें. त्यावर मानभावी-