Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भिन्न क्षेत्रांतील अपेक्षित सुधारणा । १८७

अनृत-भाषण, विश्वासघात, अप्रामाणिकपणा, क्रूरपणा हीं महापातकें आचरणाऱ्या मनुष्यावर तुटून पडत नसत. निदान त्याकडे दुर्लक्ष करीत. असा महापातकी मनुष्य स्नानसंध्या, टिळेमाळा, जपजाप्य करीत असेल तर त्याच्या पायाचें तीर्थ घेण्यासहि सनातन धर्मनिष्ठ लोक तयार होतील; पण या पातकापासून अगदी अलिप्त असलेला मनुष्य जर शूद्राच्या हातचें पाणी पिईल तर मात्र त्याला ते धर्मभ्रष्ट मानतील! अशी टीका करून आगरकर संतापाने म्हणतात, काय धर्म! काय धर्मशास्त्रे! धिक् तुमच्या धर्माला, आणि तुम्हांला!
 आगरकरांचा रोख कशावर होता हें यावरून ध्यानीं येईल. समाजाचा अभ्युदय घडविणारा जो धर्म त्यावर त्यांचा मुळीच आक्षेप नव्हता. इतकेंच नव्हे, तर त्या धर्माचें त्यांनी स्वतःच जन्मभर आचरण केलें होतें. याच दृष्टीने प्रा. वामनराव जोशी यांनी त्यांना धर्मनिष्ठ, आस्तिक असें म्हटलें आहे. वामनराव 'ध्येय हाच देव' मानीत असत. आणि त्या अर्थाने आगरकरांची देवावरहि श्रद्धा होतो असें त्यांनी म्हटले आहे.
 आचार, नीति व तत्त्वज्ञान हीं धर्माचीं तीन अंगें. त्यांतील आचाराला जड कर्मकांडाचें रूप आलें की तो आगरकरांना त्याज्य वाटे. एरवी सदाचार, बुद्धिपूर्वक घालून दिलेले नियमन त्यांना मान्यच होते. नीतीसंबंधी वर लिहिलेच आहे. नीति हाच खरा धर्म असें त्यांना वाटत असे. राहिलें तत्त्वज्ञान. या बाबतींत आगरकरांनी फारसें विवेचन कोठें केलेलें नाही. 'ईशस्वरूप आमच्या सांप्रतच्या ज्ञानेंद्रियास अगम्य आहे,' असे ते म्हणत असत; पण कोणत्याहि प्रकारच्या तत्त्वज्ञानास त्यांनी कधी तुच्छ लेखिलें नाही. उलट त्या चिंतनाचें त्यांनी फार महत्त्व गाइलें आहे. देवतोत्पत्ति या विषयाचा समारोप करतांना ते म्हणतात, "जो जो बुद्धीचा विकास होत जाऊन कार्यकारणांचा संबंध कळू लागतो तो तो प्राथमिक व पौराणिक कल्पना मिथ्या भासूं लागून भूत-पिशाच, देव-दानव यांची असत्यता प्रत्ययास येते. पूजेस व प्रार्थनेस ओहोटी लागते आणि कांही वेळ सर्व ब्रह्मांडास उत्पन्न करून त्याचें परिपालन व नाश करणाऱ्या अशा एका परमात्म्याच्या कल्पनेचा उदय होतो. पण पुढे वेदान्त- विचाराच्या कुंडांत पेटलेल्या अग्नींत हें द्वतहि खाक होऊन जातें व अहं ब्रह्मास्मि एवढा अनिर्वचनीय विचार मागे राहतो! व्यक्तीच्या व राष्ट्राच्या धर्मविचारांचा हा कळस आहे. येथपर्यंत ज्याची मजल आली त्याला सर्व धर्म तुच्छ आहेत!
 मोठमोठे वेदान्ती- तत्त्ववेत्ते तरी यापेक्षा निराळें काय सांगतात?
राजकीय सुधारणा
 आगरकर जसे कडवे सामाजिक सुधारक होते, तसेच राजकीय क्षेत्रांतहि सुधारणावादी होते, हें त्यांचें असामान्यत्वच म्हटले पाहिजे. कारण बहुधा असें आढळत नाही. महाराष्ट्रांतील इतर पुढारी कुठल्या तरी एकाच क्षेत्रांत विशेष