Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८६ | केसरीची त्रिमूर्ति

वादांत समंजस मनुष्याने कधी पडूं नये. यांतूनच निवृत्ति व प्रवृत्ति असे दोन विचार व आचारपंथ झाले आहेत; पण फल-मूलाशन करून राहवें, पूर्ण वैराग्याचें अवलंबन करावें, पर्वतांच्या गुहांत वास करावा आणि संसाराच्या भानगडीत पडूं नये, असे निवृत्तिपंथाचे प्रचारक आज शेकडो वर्षे सांगत असतां, व बऱ्याच अंशीं वागून दाखवीत असतां प्रवृत्ति मार्गाकडे जग अधिकाधिक चाललें आहे. तेव्हा सामान्य विचाराअंती असे दिसून येईल की, ऐहिक उपभोगांमुळे मनुष्यप्राणी इतर प्राण्यांपेक्षा सुखी होंवो न होवो, त्या उपभोगांची वांछा तृप्त करावी असाच मनुष्याचा स्वभाव आहे; आणि हें जाणून त्याने इतर प्राण्यांपेक्षा शेकडोपट अधिक उद्योग केला पाहिजे.
 असा उद्योग न केला तर मनुष्याला इष्ट वाटणारी सुखें तर मिळणार नाहीतच; पण तसा उद्योग करणाऱ्या लोकांशी निवृत्तिमार्गी लोकांची गाठ पडली तर त्यांचें स्वातंत्र्यच नष्ट होईल व त्या उद्योगी लोकांच्या अधीन होऊन त्यांना रहावें लागेल. हिंदु लोकांचें सध्या तसें झालें आहे. शेकडो वर्षे कमी वासना व कमी तृप्ति हा निवृत्तिमार्ग स्वीकारून ते निरुद्योगी राहिले; आणि आता अत्यंत उद्योगी अशा इंग्रज लोकांशी त्यांची गाठ पडली आहे. तेव्हा एकतर आम्ही त्यांच्यासारख्या उद्योग करण्यास राजी झालें पाहिजे किंवा ते ज्या स्थितींत आम्हांला ठेवतील त्या स्थितीत राह्ण्यास सिद्ध झाले पाहिजे. आमचें भावी स्वातंत्र्य, अथवा आमचें निरंतरचें दास्य, सर्वर्थव आमच्या उद्योगावर अवलंबून आहे.
 प्रवृत्तिवादावर एक आक्षेप नेहमी घेतला जातो. मनुष्य एकदा ऐहिक सुखाच्या मागे लागला की सुखेच्छेला, त्याच्या वासनांना मर्यादा राहत नाही, आणि त्यामुळे समाजाचा अधःपात होतो. या आक्षेपाला आगरकरांनी दिलेलें वरील उत्तर अभिनव असें आहे. जास्त वासना व जास्त तृप्ति यांमुळे मनुष्य सुखी होवो न होवो; पण भीतीमुळे तो निरुद्योगी झाला तर जो अधःपात होतो तो केव्हाहि स्वीकारार्ह ठरणार नाही. निवृत्तीमुळे समाजाचें स्वातंत्र्यच जातें. यापेक्षा दुसरा अधःपात तो काय? निरयगति कांही निराळी असते काय?
 आगरकरांनी हिंदु धर्मावर व एकंदर धर्म या संस्थेवर फार प्रखर टीका केली आहे; आणि ऐहिक उत्कर्षास धर्माची मुळीच गरज नाही असें म्हटलें आहे; पण ही त्यांची टीका कर्मकांडात्मक धर्मावर आणि पारलौकिक धर्मावर होती हें आपण ध्यानांत ठेविलें पाहिजे; पण धर्माचा व्याप एवढा मर्यादित नाही. समाजाचा प्रभव (उत्कर्ष) ज्याने होतो तो धर्म, ज्यामुळे धारणा होते तो धर्म, अशा ज्या धर्माच्या व्याख्या प्राचीनांनी केलेल्या आहेत, त्याअन्वये पाहतां आगरकरांना धर्मनिष्ठा पूर्ण मान्य होती, असें दिसून येईल. ध्येयवाद, त्याग, सदाचार, नीतिनिष्ठा, लोकसेवा, परोपकार, सत्यनिष्ठा या तत्त्वांनी संपन्न असा जो धर्म तोच खरा धर्म होय, असें त्यांनी अनेक ठिकाणी म्हटलें आहे; आणि त्या भूमिकेतून कर्मकांडात्मक धर्मावर टीका केली आहे. कारण त्या धर्माचे पुरस्कर्ते मांसाहार, मदिरापान, व्यभिचार,