१८८ । केसरीची त्रिमूर्ति
कार्य करणारे होते. लोकहितवादी, रानडे, भांडारकर यांनी मुख्यत: सामाजिक व धार्मिक सुधारणेचा पुरस्कार केला. त्यांच्या लेखांत लोकांचे सामान्य हक्क, प्रतिनिधित्व अशांसारख्या राजकीय सुधारणांची मागणी आहे, नाही असें नाही; पण त्यांचा मुख्य भर सामाजिक व धार्मिक सुधारणांवर होता. त्याच्या उलट टिळक प्रभूति जहाल पुढाऱ्यांचा मुख्य भर राजकीय सुधारणांवर होता. त्यांना सामाजिक सुधारणा नको होती असें नाही; पण राजकीय स्वातंत्र्यासाठी सर्व सामर्थ्य वापरले पाहिजे, त्यानंतर सामाजिक सुधारणा सहज होतील, असें त्यांचे मत होतें. आगरकरांना मात्र समाजाची सर्वांगीण सुधारणा होणें अत्यंत आवश्यक वाटत होतें. राजकीय, धार्मिक व सामाजिक या तिन्ही क्षेत्रांत सुधारणा होते तेव्हाच समाजाची खरी उन्नति होते, असें त्यांचें मत होतें आणि सर्व सुधारणा एकाच वेळीं होणें उचित होय असेंहि त्यांना वाटत होते; पण धार्मिक व सामाजिक सुधारणा प्रथम झाल्यावांचून राजकीय सुधारणा करणें व मिळालेलें स्वातंत्र्य टिकवणें हिंदु समाजाला शक्य नाही म्हणून सामाजिक सुधारणांना त्यांनी अग्रक्रम दिला. तथापि त्यांच्या अनेक लेखांत त्यांनी राजकीय सुधारणांचेंहि विवेचन केलें आहे आणि जहाल पक्ष इंग्रजी राज्यकारभारावर जशी कडक टीका करीत असे, तशीच टीका आगरकरांनीहि केली आहे. तिचें स्वरूप आता पाहवयाचें आहे.
(१) दारिद्र्य - 'गुलामाचें राष्ट्र' या लेखांत आगरकरांनी हिंदुस्थानच्या दुर्दशेचें वर्णन केलें आहे. इंग्रज सरकारने आपल्या राज्याच्या रक्षणासाठी जें सैन्य ठेवलें होतें त्यावर अतोनात खर्च चालू होता आणि इतर खात्यांचा कारभारहि अत्यंत महागडा होता. एका शतकांत त्यासाठी दोन निखर्व रुपये या देशांतून परदेशांत गेले. अशा प्रकारे हा देश धुऊन निघत होता, इंग्रज लोक त्याची लूट करीत होते. त्यामुळे इथल्या लोकांची अन्नान्नदशा झाली होती. हें इंग्रजी राज्य असेंच चालू राहिलें, तर त्याचे या देशावर इतके भयंकर दुष्परिणाम होतील की, भुकेमुळे बेफाम झालेले लोक सरकारविरुद्ध बंड करून उठतील असें त्यांना वाटत होते. ज्याला या देशाविषयी कळकळ आणि लोकहिताविषयी तळमळ वाटत असेल त्याने ही वस्तुस्थिति उघड करून सांगितलीच पाहिजे, असें त्यांचें म्हणणें होतें. ह्यूमसाहेबाने आपल्या पत्रांत हिंदुस्थानांतल्या भयानक दारिद्रयाचें वर्णन केलें होते; आणि दादाभाई नौरोजी, डॉ. हंटर वगैरे लोकहि तेंच सांगत होते. इथले निम्म्याहून जास्त लोक अर्धपोटी आहेत, असेंच त्यांचें म्हणणें होतें.
दुसऱ्या एका लेखांत आगरकरांनी मुंबई शहराच्या तत्कालीन वैभवाचें वर्णन करून पुढे असें म्हटलें आहे की, हा सगळा बाह्य देखावा डोळे दिपविणारा आहे. वरवर पाहणाराला सगळीकडे झगमगाट दिसत असला, ऐश्वर्य भरलेले दिसत असले, तरी या देशाची व लोकांची स्थिति याहून अगदी वेगळी आहे, फार वाईट आहे. देशांतील बहुतेक संपत्ति फक्त कांही शहरांतून साठलेली आहे व तीहि इंग्रज