Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भिन्न क्षेत्रांतील अपेक्षित सुधारणा । १८३

वाटत असेल तें दुसऱ्यास सांगावें, आणि तदनुसार होईल तेवढें आचरण करावें," असा उपदेश ते करीत असत.
 यावरून हिंदु धर्मांत कोणती सुधारणा व्हावी असें त्यांना वाटत होतें, उन्नत धर्माविषयी त्यांचे काय विचार होते, याची कल्पना येईल.
 धर्माच्या निर्विकल्प रूपाविषयी आगरकरांनी हा जो सिद्धान्त मनाशी निश्चित केला होता त्याच्यामागे त्यांचें दीर्घ चितन, दीर्घ अध्ययन व समाजहिताविषयीची तळमळ ही पुण्याई उभी होती. धर्माविषयी त्यांनी जे विचार मांडले आहेत ते सर्व त्यांतून उद्भवलेले आहेत.
 (२) इहवाद - आजच्या परिभाषेत बोलावयाचें, तर आगरकर खरेखुरे इहवादी होते. आज इहवाद, धर्मनिरपेक्षता हें तत्त्व म्हणून आपण स्वीकारलेलें आहे, आणि भारताचें शासन इहवादी करावयाचें अशी येथल्या नेत्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे; पण तसें घडवावयाचें, तर आपल्या एकंदर सामाजिक व्यवहाराचें अधिष्ठानच बदलणें अवश्य आहे; कारण आज हजारो वर्षे आपल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सर्व अंगोपांगांवर धर्म-ग्रंथांची अप्रतिहतं अशी सत्ता प्रस्थापित झालेली आहे. श्रुति- स्मृति-पुराणोक्त धर्माची हिंदु जीवनावरची ही सत्ता नष्ट झाल्यावांचून येथे इहवाद यशस्वी होणें शक्यच नाही. आगरकरांच्या आधी पन्नास वर्षे राममोहन रॉय, लोकहितवादी, म. फुले, न्या. मु. रानडे इत्यादि थोर पुरुषांनी बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार करून ती सत्ता नष्ट करण्याचे प्रयत्न केले. त्या सर्वांमध्ये आगरकरांच्या प्रयत्नांना विशेष महत्त्वाचें स्थान आहे.
 आगरकर स्वतः अज्ञेयवादी होते. "ईशस्वरूप आमच्या सांप्रतच्या ज्ञानेंद्रियांस अगम्य आहे. हा धर्मासंबंधीचा शेवटचा सिद्धान्त आहे," असें त्यांनी 'आमचें काय होणार' या निबंधांत सांगून टाकलें आहे; आणि या अनुरोधानेच ते समाजशास्त्रीय तत्त्वांचे विवेचन करीत. 'आम्हा मनुष्यांना पाहिजे काय व तें मिळेल कशाने?' या आपल्या निबंधांत ऐहिक अभिवृद्धीला, मानवाच्या इहलोकीच्या उन्नतीला (पारलौकिक) धर्माची मुळीच आवश्यकता नाही, असें त्यांनी निःसंदिग्धपणें सांगितलें आहे. ते म्हणतात, "ग्रीस व इटली देशांचे जुनें वैभव, फ्रान्स देशांतील बडी राज्यक्रान्ति, जर्मनी आणि रशिया यांचे जय, पेशव्यांचा प्रचंड राज्यविस्तार, अमेरिकन लोकांचें स्वातंत्र्य व ज्यावरून सूर्य कधी मावळत नाही असे इंग्रजांचें अफाट राज्य यांचा धर्माशीं म्हणण्यासारखा कांहीएक संबंध नाही. यासाठी ऐहिक सुख पाहिजे असेल त्यांनी राजनीति, पदार्थविज्ञान, नीतिप्रसार, विद्योत्तेजन, यंत्र- कलाप्रसार व धनसंचय या विषयांकडे आपले तन-मन-धन लावावें." याच निबंधांत अन्यत्र त्यांनी म्हटलें आहे की, "ऐहिक व पारमार्थिक सुखाचे विषय व ते संपादण्याची साधनें अगदी भिन्न असल्यामुळे एकमेकांचे एकमेकांशी बहुधा पटत नाही. किंवा तीं परस्परांना उपरोधक असतात, असें म्हटलें तरी चालेल." हा विचार