Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८४ । केसरीची त्रिमूर्ति

सांगून ऐहिक उन्नतीसाठीहि धर्माची आवश्यकता आहे, असें आग्रहाने प्रतिपादन करणारे जे न्या. मू. रानडे त्यांच्यावर आगरकरांनी कडक टीका केली आहे.
 (३) बुद्धिवादाचे जनक - आजच्या इहवादी तत्त्वज्ञानाचा भावार्थ हाच आहे. पारलौकिक, शब्दप्रामाण्यवादी, पोथीनिष्ठ धर्माचें वर्चस्व ऐहिक व्यवहारावर मुळीच असतां कामा नये हाच इहवादाचा मूळ सिद्धान्त आहे. जातिभेद, अस्पृश्यता, बालविवाह, पुनर्विवाह, स्त्रीशिक्षण, लोकशाही, राजसत्ता, जमिनीची मालकी, इत्यादि जे अनेक प्रश्न सामाजिक जीवनांत निर्माण होतात त्यांच्यासंबंधीचा निर्णय इतिहास, अवलोकन, तर्क, अनुभव, प्रयोग यांच्या आधारानेच केला पाहिजे. श्रुति-स्मृति, बायबल, कुराण यांतील वचनांचा यांत कसलाहि संबंध असतां कामा नये, असे इहवाद सांगतो. आगरकरांच्या प्रतिपादनाचा सारार्थ हाच आहे. भारतांतील बुद्धिवादाचे जनक आगरकरांना म्हणतात तें याच कारणासाठी. त्यांच्या आधीचे राममोहन, रानडे, दयानंद इत्यादि थोर पुरुष जीर्णवादी लोकांप्रमाणे शब्दप्रामाण्यवादी नव्हते; पोथींतील अंध-धर्माचे अनुयायी नव्हते. तरी सामाजिक सुधारणांना शास्त्रवचनांचा आधार शोधून काढावा, असा त्यांचा प्रयत्न असे. आगरकरांना हे मनु-पाराशरांचे वर्चस्व मुळीच मान्य नव्हतें. आम्हांला सामाजिक बाबतीत निर्णय करण्याचा त्यांच्याइतकाच अधिकार आहे, असें तें निश्चयाने सांगत.
 मनुष्यजातीची पूर्णावस्था भविष्यकाळीं व्हावयाची आहे हा बुद्धिवादी पंडितांचा दुसरा सिद्धान्त आहे. बहुतेक सर्व प्राचीन धर्मवेत्ते असें मानीत नाहीत. त्यांच्या मतें मानवी समाजाची पूर्णावस्था मागे सत्ययुगांत होऊन गेली व आता तिचा अधःपात चालू आहे. म्हणूनच सध्याच्या युगाला कलियुग म्हणतात. मनु, कनफ्यूशियस इत्यादि धर्मवेत्त्यांचे समाजाला स्थिरावस्था आणण्याचे प्रयत्न असत ते याचसाठी. कारण गति प्राप्त झाली की ती अधःपतनाकडेच नेणार, असे त्यांना वाटत असे. म्हणून आहे ही स्थिति तरी टिकवावी या हेतूने त्यांनी धर्मशास्त्र रचलें होतें आणि तसें शास्त्र रचून समाजाला स्थिरावस्था आणण्यांत ते यशस्वी झाले होते, यांत शंका नाही. याच अवस्थेला आगरकर शिलावस्था म्हणतात, आणि हिंदु समाजांवर ओढवलेली ती सर्वांत मोठी आपत्ति होय, असें त्यांचें म्हणणें होतें, आणि तें अगदी यथार्थ होतें. त्यामुळेच आता ती शिलावस्था नष्ट करावयाची तर मनु-याज्ञवल्क्यांच्या धर्मशास्त्रामागे सत्य-कलियुगाची जी कल्पना होती ती नष्ट करणें अवश्य होतें. त्याच हेतूने आगरकरांनी हा प्रपंच केला आहे. पुढे सर्व कलियुग आहे, आता कांही केलें तरी समाजाचा अधःपातच होणार हा विचार ज्या लोकांच्या मनांत दृढमूल होऊन बसणार आहे त्यांची उन्नति होणें कदापि शक्य नाही. कारण उद्योग करण्याची उभारी माणसाला येते ती भविष्यकाळच्या आशेमुळे. ती आशाच कलियुगाच्या तत्त्वज्ञानामुळे नष्ट झाल्यावर उद्योग करण्याचा उत्साह मानवाच्या