Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८२ । केसरीची त्रिमूर्ति

सांपडत नाही. दुसरा वर्ग सुखाभिलाषी लोकांचा. यास मानसिक सुखापेक्षा शरीरसुखाची चाड विशेष असते. वारुळांत जशी एक खुशालचेंडू राणी मुंगी असते, तीसारखे हे सुखपरायण लोक होत. या सुखपरायण वर्गाशिवाय आणखी एक तिसरा वर्ग असतो. या वर्गांतील लोकांची क्रिया-प्रवृत्ति (शारीर कष्ट करण्याची शक्ति) फार जबरदस्त असते; व एका दृष्टीने त्यांस समाजांचे आधारस्तंभ म्हणतां येईल. यांनी काबाडकष्ट करून चैनीचे पदार्थ उत्पन्न करावे व इतर दोन वर्गांनी त्यांचा उपभोग घ्यावा असे आजपर्यंत बऱ्याच अंशीं चालत आले आहे: ही असमता ज्या देशांत वाढत जात असेल त्या देशाच्या ऱ्हासाचा प्रारंभ झाला आहे, असें समजावें. जेव्हा या असमतेची परमावधि होते तेव्हा घनघोर राज्यक्रांति होऊन समाजचे समाज लयास जातात, धुळीस मिळतात किंवा त्यांत अपूर्व स्थित्यंतरें होतात. यावरून हे दिसून येतें की, सध्या वरील तीन ठळक वर्ग दृष्टीस पडतात ते कायमचे नव्हेत. हळूहळू प्रत्येक व्यक्तीस विचार, उपभोग आणि काम हीं समप्रमाणाने करावी लागून साऱ्यांच्या सुखानुभवाची इयत्ता सारखी होत जाणार आहे व जो जो ती तशी होत जाईल तों तों खरी उन्नति होऊ लागली असें म्हणतां येऊं लागेल.
 समाजवाद हा शब्द आगरकरांच्या काळी आपल्याकडे रूढ झालेला नव्हता; पण त्यांच्या वरील प्रतिपादनाचा भावार्थ तोच आहे हें सहज ध्यानांत येईल. त्यांनी हे लेख लिहिले त्या वेळी संपत्तीची समान नव्हे, पण न्याय्य वांटणी सुद्धा होऊं लागली नव्हती. त्यासाठी दोन महायुद्धे व्हावीं लागलीं; पण त्यानंतर आता पाश्चात्त्य देशांत तरी त्यांनी वर्तविलेली सुखानुभवाची समान इयत्ता प्रत्यक्षांत येत आहे; आणि जेथे ती तशी आलेली नाही त्या देशांची वाटचालहि त्याच मार्गाने चालू आहे, असें दिसतें. हें भविष्यदर्शन पाऊणशे वर्षांपूर्वी आगरकरांना झालें होतें. हाच त्यांच्या प्रतिभेचा विशेष.
धार्मिक सुधारणा
 हिंदु धर्माला आगरकरांच्या काळीं अत्यंत मलिन, हीन रूप आलें होतें. गेली हजार वर्षे तो कर्मकांडात्मक जड धर्म झाला होता. समाजाला अत्यंत घातक अशा रूढींचा त्यांत बुजबुजाट झाला होता. अशा त्या धर्माची आगरकरांना अगदी शिसारी येत असे. "हे अमंगल हिंदु धर्मा" असें त्याला संबोधून ते त्याच्यावर प्रखर टीका करीत. ती टीका कोणत्या प्रकारची होती तें मागे आपण पाहिलेच आहे. आता त्यांच्या मतें धर्माचें उन्नत, परिणतं रूप कोणतें होतें तें पाहवयाचें आहे.
 (१) ऐहिक सुखवर्धन - आगरकरांना हिंदु धर्माचें संशोधन करून त्याला निर्विकल्प रूप आणावयाचें होतें. तें निर्विकल्प रूप कोणतें? "मनुष्यतेचें ऐहिक सुखवर्धन" हा भावी काळांत सार्वत्रिक धर्म व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्या धर्माची त्यांनी स्वतः दीक्षा घेतली होती, आणि आपल्या समानधर्मी सुधारक मित्रांना, "त्यांनी कोणास न भिता, आपल्या मनास जें शुद्ध, प्रशस्त व कल्याणप्रद