Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भिन्न क्षेत्रांतील अपेक्षित सुधारणा । १८१

कारणाचा आगरकरांनी जातिभेदासारखाच विचार केला होता. आणि वेळीच या विषमतेला पायबंद घातला नाही तर आपला समाज उत्सन्न होईल, असा इशाराहि दिला होता. ते म्हणतात.
 "आमच्यामध्ये विचारस्वातंत्र्य व व्यवसायस्वातंत्र्य आल्याने आमच्या समाजाचें पूर्वी जें जातिभेदामुळे व धर्माभेदामुळे वर्गीकरण झालें होतें त्याचा आता लोप होत जाऊन प्राप्तीच्या व संपत्तीच्या मानाने वर्गीकरण होत चाललें आहे."
 (१५) वर्गकलह - सांपत्तिक विषमता हें वर्गीकरणाचें नवीन तत्त्व कशामुळे आलें तें सांगून, याच लेखांत, तें तत्त्व समाजास राज्यकारणी किती अपायकारक आहे व त्यापासून किती जुलूम होत आहे, त्याचीहि कल्पना लोकांना आगरकरांनी दिली होती. इतकेंच नव्हे तर कामगारवर्गाने संघटित होऊन या नव्या जुलमाचा प्रतिकार केला पाहिजे, असा उपदेशहि त्यांनी केला होता. 'रेल्वे कंपन्या व रेल्वेकडील नोकर' या लेखांत ते म्हणतात, "राजांचा व धन्यांचा आपल्या प्रजेशी व नोकरांशी नित्य कलह चाललेला असतो. तो इतका की, हा कलह हा उभयतांच्या मनोवृत्तीचा स्वाभाविक परिणाम, आणि उभयतांचा सलोखा हा अपवाद, असें म्हटलें तरी चालेल. आमच्या रेल्वे कंपन्या आणि त्यांचे नोकर या दुसऱ्या कोटींत पडतात. रेल्वेकडील नोकरांनी आपल्या धन्याशीं कलह करण्याचा निश्चय केल्याखेरीज त्यांची विपत्ति दूर होण्याचा संभव नाही" (केसरीतील निवडक निबंध, पुस्तक १ लें). या विषयावरील अन्य लेखांत आगरकरांनी कोळशाच्या खाणी, गोद्या, तारायंत्रे इत्यादि इतर धंद्यांतहि कामगारांना कट (संप) करणें कसें अवश्य आहे तें सांगून युरोप-अमेरिकेतील कामगार संप करून आपले उद्दिष्ट कसे साध्य करून घेतात त्याचें वर्णन केलें आहे. संप हा जसा सांपत्तिक विषमता नष्ट करण्याचाः मार्ग तसाच भांडवलदारांच्या बाजूने आचरण्याचा दुसराहि एक मार्ग आहे. कामगारांना नफ्यांतला कांही वांटा देणें हा तो मार्ग आहे. आज हा विचार पूर्ण रूढ होऊन गेला असून तो प्रत्यक्ष आचरणांतहि आणला जात आहे. पण १८८० सालापासून, केसरीच्या प्रारंभीच्या अंकापासून, आगरकरांनी त्याचें प्रतिपादन केलेलें आढळते. यावरून केवळ प्राचीन काळच्या सामाजिक विषमतेचाच विचार आगरकरांनी केला असें नसून, सध्याची घडी विस्कटल्यावर नव्या समाजरचनेत उद्भवणाऱ्या नव्या आर्थिक विषमतेचाहि विचार केला होता, असें दिसून येईल.
 ही नवी आर्थिक विषमताहि जुन्या जातीय विषमतेइतकीच घातक असल्यामुळे ती नष्ट करण्यासाठी तरुणांनी बद्धपरिकर व्हावे अशी या देशांतल्या 'तरुण सुशिक्षितांस आगरकरांनी विज्ञापना' केली आहे. तिचा सारार्थ असा: विचार करणें, सुखदुःखाचा अनुभव घेणें व क्रिया करणें या तीन गोष्टींपैकी पहिलीत, दुसरींत व तिसरीत प्रत्येक मनुष्य चूर होऊन गेलेला असतो. दीर्घ चिंतन करून ग्रंथरूपाने आपलें तत्त्वज्ञान लोकांपुढे मांडणारांचा एक वर्ग. अशांस बाह्य सुखांचा फार उपभोग