१८० । केसरीची त्रिमूर्ति
आहे, असें आगरकरांचें मत होतें. पूर्णावस्थेचें विवेचन करतांना ते म्हणतात, "ज्यांची जातिभेदावर श्रद्धा आहे त्यांच्या मतें मानवाच्या पूर्णावस्थेचा काळ मागेच होऊन गेला असून आता समानतेकडे मानवाचा कल होत असल्यामुळे दिवसेदिवस मनुष्यजातिभ्रंश पावत आहे; पण जेथे लोकांना जन्मतः सर्वांमध्ये साम्य आहे असें वाटत असतें तेथे याहून भिन्न स्थिति असते. तेथे कोणासहि आपण आहों तीच पूर्णावस्था आहे असें भासत नाही. आपल्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यास जागा आहे असें प्रत्येकास वाटतें व त्यास ती करण्यास पुष्कळ उमेद असते. युरोपीय समाजांत ती समजूत दृढ होत आहे. या समजुतीनेच त्यांचे सुधारणेकडे सदोदित प्रयत्न चालले आहेत. या समजुतीने युरोपीय लोकांत किती परिश्रम, किती उद्योग, किती धाडस व किती घडामोड सुरू आहे याची आमच्याने कल्पनाहि करवत नाही." (केसरींतील निबंध, पुस्तक दुसरें, पृ. ८१).
(१३) अस्पृश्यता - जातिभेदाविषयी आगरकरांची मतें जशीं अगदी पुरोगामी व क्रांतिकारक होतीं तशींच अस्पृश्यतेविषयीहि होतीं, या विषयाचें त्यांनी विस्तृत विवेचन केलेलें नाही; पण एक-दोन ठिकाणीं जातां जातां जीं मतें मांडलीं आहेत त्यावरून त्या काळांतहि आगरकर किती निर्भयपणें लिहीत असत हें ध्यानीं येईल. ते म्हणतात, "महाराची सावली पडली असतां विटाळ मानणारे लोक, कितीहि लांब जिभा करून, "अमचा रंग काळा असला व तुमचा गोरा असला म्हणून काय झालें? रंगावर कांही मनुष्याची पानापात्रता ठरत नाही," वगैरे गोष्टी प्रतिपादूं लागले; तथापि त्यांच्या शब्दांस जोर येण्याचा संभव नाही. त्या शब्दांस जोर येऊन इतरांनी ते ऐकलेच पाहिजेत अशी खरोखर इच्छा असल्यास, 'ब्राह्मणोस्य मुखमासीत्' हें पक्षपाती शास्त्र झुगारून देऊन, आपल्या मांडीला मांडी भिडवून शाळांतून बसण्यास महारांस मोकळीक दिली पाहिजे." (मूळ पाया चांगला पाहिजे). 'इति श्रीचहाग्रामण्य प्रकरणं समाप्तम्' या लेखांत याच्याहि पुढे जाऊन ते म्हणतात, "ब्राह्मणेतरांच्या हातचा चहा पिण्यांत आम्हांस दोष वाटत नाही. इतकेंच नव्हे, तर नीच मानलेल्या महारांची स्थिति सुधारून त्यांची व वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांची एक पंगत झालेली जर आम्हांस पाहतां येती तर आम्ही स्वतःस मोठे कृतार्थ मानलें असतें, ही गोष्ट आमच्या देशबांधवांपासून आम्ही चोरून ठेवीत नाही."
(१४) वर्णभेद - वर्णभेद, जातिभेद, अस्पृश्यता हीं विषमतेची जुनीं कारणें होत. पाश्चात्त्यविद्येमुळे येथल्या समाजाची ही जुनी घडी विस्कटली हें खरें. आपला समाज व्यक्तिवादी होऊं लागला; आणि विचारस्वातंत्र्य, व्यवसायस्वातंत्र्य हीं प्राप्त होऊन समाजाची घडण बदलूं लागली. या नव्या समाजांत स्वातंत्र्याबरोबरच समता तत्त्वालाहि तितकेंच महत्त्व होते; पण तरीहि त्यांत वर्गभेद निर्माण होऊन एक नवीनच विषमता निर्माण होऊं लागली होती. विषमतेच्या याहि