भिन्न क्षेत्रांतील अपेक्षित सुधारणा । १७९
"अशी व्याख्यानें ऐकून आमच्या धर्माभिमानी लोकांस या स्त्रीस कोठे ठेवूं आणि कोठे न ठेवू, असें झालें आहे. पण त्यांनी हें ध्यानांत ठेवावें की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या वर्णव्यवस्थेच्या कैवारणीस या चार जातींत जे असंख्य पोटभेद आहेत ते मुळीच संमत नाहीत. ते मोडून टाकणें अत्यवश्य आहे असे तिचें मत आहे. आमचे लोक हे करण्यास तयार आहेत काय? असतील तर या हिंदु आचार-विचारांचें मंडन करणाऱ्या विदुषीचे आम्हांवर अगणित उपकार झाले, असें आम्ही मोठ्या आनंदाने कबूल करूं."
वास्तविक जिला आपण वर्णव्यवस्था म्हणतों ती भारतांत ऐतिहासिक काळांत कधीच अस्तित्वांत नव्हती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे चारच वर्ण आहेत व त्यांच्यांत पोटभेद, जातिभेद मुळीच नाहीत, अशी स्थिति भारतांत केव्हाही नव्हती. त्याचप्रमाणे ब्राह्मण केवळ अध्ययन-अध्यापन, क्षत्रिय फक्त राज्यकारभार व युद्ध, वैश्य फक्त धनोत्पादन आणि शूद्र केवळ सेवा करीत आहेत असेंहि कधी इतिहासांत दिसत नाही. इतकेंच नव्हे, तर इतिहासपूर्व काळांतहि अशी स्थिति नव्हती. यांचा अर्थ असा की, भारतांत चातुर्वर्ण्यव्यवस्था केव्हाहि अस्तित्वांत नव्हती; पण चातुवर्ण्य, चातुर्वर्ण्य असा घोष मात्र कायम चालू होता. या ढोंगीपणाची आगरकरांना अत्यंत चीड येत असे. या लेखांत त्यांनी पुढे हीच टीका केली आहे. हल्ली जे लोक ब्राह्मण या नांवाखाली मोडतात त्यांनी आपला सगळा वेळ अध्यात्मविचारांत घालविला पाहिजे. तसें करण्यास ते लोक राजी आहेत काय? तसें ते नसतील तर आपणांस ब्राह्मण म्हणवून घेऊन फुकाची आढ्यता मारण्यांत व टाळ्यांच्या गजरात व्याख्यातीचें अभिनंदन करण्यांत काय अर्थ आहे?
(११) वर्णसंकर हितावह - जातिभेद, वर्णभेद यांविषयी आगरकरांचे असे विचार असल्यामुळे या देशांत वर्णसंकर घडून येणे हितावह होय, असें त्यांनी स्पष्टपणें प्रतिपादिले आहे. वर्णसंकर ही धर्मग्लानि होय असे जीर्णवादी लोकांनां वाटते; पण आगरकर म्हणतात, "त्यांच्या धर्मग्लानीच्या बऱ्याच भागास आम्ही धर्मग्लानि न समजतां धर्मोत्कर्ष समजतों. मूर्तिपूजा अजीबात नाहीशी होणें, यज्ञयागांचें थोतांड शिथिल होत जाणें, वर्णसंकर होऊन पाहिजे त्याला पाहिजे त्याशी अन्नोदकव्यवहार करण्याची किंवा लग्न करण्याची सदर परवानगी असणें, पाहिजे त्याने पाहिजे त्या शास्त्रांचा किंवा धर्मग्रंथांचा अभ्यास करणें, वगैरे गोष्टी प्रचारांत आल्यास कोणत्याहि प्रकारची धर्मग्लानि होणार आहे असें आम्हांस वाटत नाही. त्या जुन्या प्रकारच्या आचारांनी हिताहून अहितच अधिक होत आहे, असा आमचा समज आहे."
(१२) पूर्णावस्था - मानवजातीची पूर्णावस्था मागे येऊन गेली व ती पूर्णावस्था अद्याप यावयाची आहे व ती पुढे येणार आहे, अशी दोन मतें लोकांत रूढ आहेत. त्यांपैकी पूर्णावस्था मागे होऊन गेली या मताचा व जातिभेदाचा दृढ संबंध