१७८ । केसरीची त्रिमूर्ति
म्हणतात, "जातीमुळे आपला देशाभिमान संकुचित झाला आहे. जातीमुळे ज्ञान, कला, शास्त्रे हीं जेथल्या तेथे कोंडल्यासारखी झाली आहेत. जातीमुळे धर्मविचारांत व आचारांत मतभेद उत्पन्न होऊन तो परस्पर वैरास, छळास व मत्सरास कारण झाला आहे. जातीमुळे अन्नव्यवहार, विवाह वगैरेंच्या संबंधाने अतिशय गैरसोय झाली आहे. जातीमुळे देशांतल्या देशांत किंवा परदेशी प्रवास करणे कठीण झालें आहें, जातीमुळे परद्वीपस्थ व परधर्मीय लोकांपासून अलग राहवें लागल्यामुळे फार नुकसान होत आहे. या जातीमुळे आमची भूतदया, आमचें बंधुप्रेम, आमची उदारता, आमची धर्मबुद्धि आमची परोपकाररती यांचें क्षेत्र अतिशय मर्यादित झालें आहे. सारांश, आज ज्या अनेक विपत्ति आम्ही भोगीत आहों, त्यांपैकी ज्यांचें जनन जातिभेदापासून झालें नाही अशा फारच थोड्या असतील.
आगरकरांच्यानंतर गेल्या पाऊणशे वर्षांत भारताच्या इतिहासाचे खूप संशोधन झालें असून, हिंदूंच्या समाजरचनेचा व इतिहासाचा अनेक मोठमोठ्या पंडितांनी कसून अभ्यास केला आहे, त्यांपैकी बहुतेकांनी जातिभेदामुळे हे दुष्परिणाम, हे अनर्थ झाले असल्याचें मान्य करून, आगरकरांच्या या मताला प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे पाठिंबाच दिला आहे. आगरकरांच्या सामाजिक निदानाचा हा मोठाच विजय मानला पाहिजे.
या जातिभेदामुळे खऱ्या नीति-धर्माची या समाजांत कशी परवड झाली होती हें आगरकरांनी 'आता धर्माभिमानी स्वतःच वेगळी जात करणार म्हणतात' या लेखांत दाखवून दिलें आहे. ते म्हणतात, अमुक देशांत किंवा अमुक जातींत जन्म होणें हें कांही मनुष्याच्या हातचें नाही. परंतु सदाचाराने किंवा दुराचाराने वागणें हें मनुष्याच्या हातचें आहे. पहिल्या गोष्टीमुळे मनुष्य दोषी होतो असे गृहीत धरलें तरी तो दोष दुसऱ्या दोषापेक्षा अर्थातच कमी असला पाहिजे; पण हा विचार आमचे सनातनी बांधव करणार नाहीत. तारतम्याने पाहिल्यास भिन्नधर्मीय व भिन्नदेशीय सुजनाने स्पर्शिलेल्या अन्नपाण्याहून स्वदेशीय व स्वधर्मीय दुर्जनाच्या हातचें पाणी अधिक त्याज्य असें आम्हांस वाटतें. हीन जातीय आणि दुराचारी यांत नीतिदृष्ट्या पाहतां दुराचारी हा खरा अस्पृश्य होय; पण हिंदुसमाजांत जातिभेदाचा प्रभाव इतका आहे की, हा सामान्य विवेक लोकांनी केव्हाहि दाखविलेला नाही. वाटेल त्या दुचाराचारी, पापी, समाजद्रोही मनुष्याला हिंदु लोक जवळ करतील; पण सदाचारी हीनजातियाची सावली सुद्धा घेणार नाहीत. आगरकरांच्या मतें हा अधर्म आहे.
(१०) ॲनी बेझंट - १८९३ साली ॲनी बेझंट या हिंदुस्थानांत आल्या आणि त्यांनी पुण्यास एक व्याख्यान देऊन असें सांगितलें की, "पाश्चात्त्य व भारतीय समाजरचनेची तुलना करतां भारतीय समाजरचना श्रेष्ठ ठरते; पाश्चात्त्य समाजांत अतिश्रीमंत व अति दरिद्री असे दोन वर्ग पडत आहेत म्हणून ती समाज-रचना वर्णव्यवस्थेपेक्षा हीन आहे." यावर टीका करतांना आगरकर म्हणतात की,