भिन्न क्षेत्रांतील अपेक्षित सुधारणा । १७७
त्यांच्यांत अनीति माजली आहे, असें दिसत नाही. उलट स्त्रियांच्या सान्निध्यामुळे पुरुष नेहमी उल्हसित असतात. स्त्रियांना घरांत किंवा गोषांत ठेवल्याने समाजांची नीति वाढते, या म्हणण्यांतहि कांही अर्थ नाही. स्त्री-पुरुषांचा नित्य सहवास असेल, मोकळेपणीं बोलणें-चालणें असेल, तर त्यांच्या मनांत विषयवासना उत्पन्न होण्याचा संभव कमी असतो, उलट विशेष प्रसंगीच नटलेल्या स्त्रिया दृष्टीस पडल्यामुळे पुरुषांच्या मनांत त्यांच्याविषयी ओढ उत्पन्न होऊन, त्या अप्राप्य असल्यामुळे विकृत भावना निर्माण होतात. नित्य सहवास लाभल्याने नीतीचा परिपोषच होईल, असभ्यपणाचें वर्तन बंद होईल, बोलण्यांतली अश्लीलता कमी होईल. अशा प्रकारे प्रौढ स्त्री- पुरुषांचा मिश्र समाज सुखावह होण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच एकत्र शिक्षण देणें अवश्य आहे. अशा शिक्षणामुळे चांगला परिणाम होतो, असा अनुभव युरोप- अमेरिकेत आला आहे. वरिष्ठ शिक्षणहि तरुण-तरुणींना एकत्र देणें चांगलें, असें दिसून आले आहे. अशा प्रकारें एकत्र शिक्षण देण्यावर पुढील आक्षेप घेण्यांत येत -
१. स्त्री-पुरुषांत नैसर्गिक भेद असतो, त्याप्रमाणे त्यांच्या शिक्षणांत फरक करणें अवश्य असतें. एकत्र शिक्षण दिलें तर तसा फरक करतां येणार नाही. २. मुलांच्या दांडगेपणाचा मुलींच्या वर्तनावर दुष्परिणाम होतो. मुलींच्या सहवासामुळे मुलांचा व्रात्यपणा मात्र कमी होत नाही. ३. मुलामुलींच्या सहवासामुळे त्यांची विषयवासना लवकर जागृत होऊन त्यांच्या जीवनावर अनिष्ट परिणाम होईल.
आगरकर म्हणतात, अनुभवाने हे आक्षेप चुकीचे ठरले आहेत. १. एकत्र शिक्षणामुळे दोघांनाहि समजेल असें शिकवणें अवश्य होतें व तेंच अधिक उपयुक्त ठरते. २. मुलांचा दांडगेपणा व व्रात्यपणा मुलींच्या सान्निध्यामुळे कमी होतो असें दिसून आलें आहे. ३. सहवासामुळे विषयवासना जागृत न होतां मनें शांत व गंभीर होतात. व जीवनांतील साथी निवडणें सोपें होतें, असाच अनुभव आला आहे.
योग्य वेळी मुलींना कांही उपयुक्त शिक्षण दिलें तर तें त्यांना पुढील आयुष्यांत चरितार्थासाठीहि निश्चितपणे कामी येईल, हा विचारहि आगरकरांनी मांडला आहे. पतिनिधनामुळे स्त्री निराधार व परावलंबी होत असल्यामुळे, विधवेचें जिणें जगण्यापेक्षा पतीबरोबर जाळून घेणेंच बरें, असें तिला वाटण्याचा संभव असतो. त्यामुळेच सहगमनाची दुष्ट रूढि सुरू झाली असावी. स्वतःचें पोट भरण्यापुरतें शिक्षण तिला मिळालेलें असेल, तर विधवा स्त्री मानाने जगू शकेल व सहगमनाचा विचार तिच्या मनांत येणार नाही, असें त्यांनी प्रतिपादिले आहे.
(९) जातिभेद - स्त्री-जीवनाची दुःस्थिति हें जसें हिंदुस्थानच्या अधःपाताचें एक कारण, तसेंच सामाजिक विषमता हे, आगरकरांच्या मतें, दुसरें कारण होतें. वर्णभेद, जातिभेद, अस्पृश्यता इत्यादि अनेक रूपांनी ती विषमता या समाजात हजारो वर्षे रूढ झाली होती व या समाजाच्या प्रगतीची सर्व आशा नष्ट करून टाकीत होती "जात का करीत नाही?" या प्रश्नाला उत्तर देतांना आगरकर
के. त्रि. १२