Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७६ । केसरीची त्रिमूर्ति

मिळत असे; आणि त्यांची संततीहि चांगली निपजत असे. रोमन लोकहि मुलांप्रमाणे मुलींना शिक्षण देत असत. तथापि युरोपांत धर्मक्रांति होईपर्यंत स्त्री-शिक्षणाकडे लोकांनी फारसे लक्ष दिलें नव्हतें. ल्यूथरने धर्मसुधारणेप्रमाणेच स्त्री-शिक्षणाविषयीहि आग्रह धरला होता, कारण बायबलांतील खरें रहस्य पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाहिं कळल्याशिवाय खरी धर्मसुधारणा होणार नाही, असें त्याचें मत होते.
 समाजाच्या उन्नतीसाठी मुलींना उच्च शिक्षणहि मिळणें अवश्य आहे, असें आगरकरांनी प्रतिपादिलें आहे; पण त्याचा विचार करण्यापूर्वी बालविवाहाची चाल बंद होऊन प्रौढविवाह सुरू होणें अत्यावश्यक आहे, असें त्यांनी म्हटलें आहे. कारण तेरा-चौदाव्या वर्षांपासूनच जर मुलींच्या मागे गर्भारपण, बाळंतपण व अपत्य-संगोपन हीं लचांडें लागलीं, तर त्यांना अभ्यास करणें अशक्य होते; म्हणून उच्च शिक्षण मिळवायचे असेल, तर मुलींनी तोंपर्यंत अविवाहित राहिलें पाहिजे. हे उघड आहे.
 (८) एकत्र शिक्षण - स्त्रियांना व पुरुषांना एकाच प्रकारचें शिक्षण द्यावें आणि तेंहि एकत्र द्यावें, असेंहि आगरकरांचें मत होतें. वैवाहिक जीवनांतील विपत्ति टाळण्यासाठी त्यांच्या मतें, अशा शिक्षणाची आवश्यकता आहे. कांही लोकांचें मत असें होतें की, मुलींना फक्त प्राथमिक शिक्षण द्यावें आणि मग त्यांना घरीच ठेवून प्रपंच व्यवस्था शिकवावी. त्यांना आणखी शिक्षण देण्याविषयी आग्रहच असेल तर मुलांप्रमाणे भूगोल, शास्त्र असले अवघड विषय न शिकवतां त्यांना शिवणकाम, गायन, पाकशास्त्र, गृहव्यवस्था, भरतकाम, शिशुसंगोपन, आरोग्य हे विषय शिकवावे. स्त्रियांचीं कामें वेगळी व त्यांची बुद्धीहि कमी म्हणून त्यांना असें वेगळ्या प्रकारचें शिक्षण देणें योग्य होय, असें त्यांचें म्हणणें होतें. आगरकर म्हणतात की, हें मत स्वार्थी आहे. शेकडो वर्षे पुरुषांनी स्त्रियांवर वर्चस्व गाजवलें, तें स्त्रियांना उच्च शिक्षण दिलें तर नाहीसे होईल, आपली सत्ता जाईल अशा भीतीने हे लोक असलीं तर्कशून्य मतें मांडतात. स्त्रीची बुद्धि उच्च शिक्षणासाठी योग्य नाही हें मत पाश्चात्य देशांतील अनुभवाने खोटें ठरलें आहे. जीं शास्त्र व ज्या कला केवळ पुरुषांनाच सुसाध्य आहेत अशी कल्पना होती, तीं शास्त्रे व त्या कला स्त्रियांनाहि सुसाध्य असून, त्यांच्या अभ्यासामुळे स्त्रियांच्या नैसर्गिक चारुतेवर कांही परिणाम होत नाही, किंवा त्यांच्या अपत्य संगोपनाच्या कामांतहि उणीव येत नाही, असें दिसून आले आहे.
 स्त्री-पुरुषांना एकाच प्रकारचें शिक्षण द्यावें, एवढेच नव्हे तर तें एकत्र द्यावें, त्यांत समाजाचें हितच आहे, या मताचाहि आगरकरांनी पुरस्कार केला आहे. हिंदु समाजांत स्त्री-पुरुष मोकळेपणी एकत्र वागूं शकत नाहीत; तसे वागणें योग्य मानले जात नाही; कारण त्यामुळे समाजाची नीतिमत्ता ढासळेल अशी भीति वाटते. पण युरोपांतील स्त्री-पुरुष सर्व सामाजिक समारंभांत मिसळून वागतात, म्हणून कांही