Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भिन्न क्षेत्रांतील अपेक्षित सुधार । १७५

लावूं" अशी पंडितांना लोकांनी धमकी दिली होती, तरीहि ते डगमगले नाहीत. यामुळे आगरकरांना त्यांचे विशेष कौतुक वाटत होतें.
 याविषयी विवेचन करतांना 'न करत्यांचा वार शनिवार' या लेखांत आगरकरांनी सुधारणा-पक्षावर टीका करणाऱ्यांचा ढोंगीपणा, त्यांची भेकड वृत्ति, त्यांचे असत्याचरण यांवर विदारक प्रकाश टाकला आहे. आगरकरांना 'उतावळे सुधारक' असें लोक म्हणत असत; पण विष्णुशास्त्री पंडितांनी कसलाच उतावळेपणा केला नव्हता. त्यांनी शास्त्राधार जमविले होते. लोकांशी वाद करण्याची सिद्धता दाखविली. होती. तरी त्यांच्यावरहि जीर्णवादी लोकांनी गहजब केलाच. तेव्हा थंड्या सुधारकांविषयीहि समाजाची तीच दृष्टि होती, असें दिसून आलें. त्या वेळीं विष्णुशास्त्री पंडित यांना वे. व्यंकटशास्त्री यांनी पुनर्विवाहासाठी शास्त्राधार काढून दिले होते. त्यांचे मत पुनर्विवाहाला अनुकूल होतें, पण शंकराचार्यांपुढे वाद निघाला तेव्हा सनातनी लोकांनी त्यांना अतिशय भीड घालून उलट मत द्यावयास भाग पाडलें. याविषयी लिहितांना आगरकर म्हणतात, "अशा निर्लज्जपणाने पुनर्विवाह अशास्त्र ठरविण्याचा झालेला प्रयत्न पाहून विधिपक्षाच्या मंडळीस पराकाष्ठेचा राग यावा, व सरकार- दरबार व्हावेत व कित्येक मंडळींच्या मनांतून शंकराचार्यांवर फिर्याद करण्याचा विचार यावा यांत विलक्षण असें आम्हांस कांहीच वाटत नाही."
  (७) स्त्रीशिक्षण - गृहस्थिति आधी सुधारली तरच देशाची सर्व स्थिति सुधारेल असें आगरकर कां म्हणत असत, हें त्यावरून कळून येईल. बालविवाह, केशवपन, असंमत वैधव्य इत्यादि ज्या रूढींमुळे आमची गृहस्थिति बिघडली होती त्या रूढींच्या मागे अत्यंत तर्कदुष्ट, अमानुष अशी विचारसरणी होती; आणि त्याचप्रमाणे ढोंगी, अंध, असत्यप्रवण अशी वृत्तीहि होती. प्रत्यक्ष त्या रूढीपेक्षाहि ती विचारसरणी व ती वृत्ति या समाजाला जास्त घातक होत्या. म्हणूनचं आधी गृहस्थिति सुधारली पाहिजे, असा आगरकरांचा आग्रह होता, व ती सुधारावयाची तर स्त्रीजीवनाची स्थिति सुधारली पाहिजे असे ते म्हणत. ही स्त्रीजीवनाची स्थिति सुधारण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे स्त्रीक्षिण हा होय, असें त्यांनी सांगितलें आहे. मुलांना प्राथमिक शिक्षणाची आवश्यकता आहे; पण मुलींना, त्यांच्या मतें, अशा शिक्षणाची गरज जास्त आहे. कारण अपत्यसंगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर असते. संसार चालविण्याची जबाबदारी पुरुषांवर असली तरी मुलाला जन्म देऊन त्याच्या शरीराची व मनाची जोपासना करण्याचे काम स्त्रीच करीत असते. ज्या स्त्रीला प्राथमिक शिक्षण मिळाले आहे ती स्त्री अशिक्षित स्त्रीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारें अपत्यसंगोपन करूं शकेल यांत कांही शंका नाही. पाश्चात्त्य देशांत हा विचार आता सर्वमान्य झालेला आहे. पूर्वी त्या देशांतहि सामान्य स्त्रिया अशिक्षित असत. याला अपवाद म्हणजे स्पार्टन लोकांचा; त्यांच्या स्त्रियांना पुरुषांसारखेंच सर्व प्रकारचें शिक्षण मिळत असे, त्यामुळे त्या स्त्रियांना कुटुंबांत प्रतिष्ठा