Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७४ । केसरीची त्रिमूर्ति

आयुष्य हे ज्यांना दुर्वह ओझ्यासारखें झालें आहे, अशां लोकांनी राष्ट्रीय सभांच्या फंदात पडून मनासारखे राज्यकर्ते वरण्याची इच्छा कशाला धरावी?"
 याचा भावार्थ स्पष्ट आहे. माझी स्त्री मी निवडीन, हा आग्रह ज्याच्या बुद्धीला नाही त्याला आयुष्यांत कोणतीच गोष्ट स्वमताने निवडण्याचे सामर्थ्यं प्राप्त होत नाही, असें आगरकरांचे मत आहे. असे लोक नेहमी प्रवाहपतितच राहणार. त्यांच्या जीवनाची दिशा दुसरे कोणी तरी ठरविणार. राज्यकर्ते आपले आपण निवडणें म्हणजेच स्वातंत्र्याचा लाभ करून घेणे आणि स्वयंवर-पद्धति यांचा असा घनिष्ठ संबंध आहे."
 (५) असंमत वैधव्य - स्त्रियांच्या दुःस्थितीचें दुसरें कारण म्हणजे असंमत वैधव्य हे होय. त्यांतहि बालपणीं आलेलें वैधव्य ही अतिदारुण आपत्ति होय. हिंदु समाजांतील वरिष्ठ वर्गातील स्त्रियांच्या पुनर्विवाहास धर्मशास्त्राने व रुढीने अनेक शतकें बंदी घातलेली होती. आगरकरांच्या मतें बालविवाह जितका निषिद्ध तितकीच पुनर्विवाहबंदीहि निषिद्ध होय. विधवा स्त्रीला पुनर्विवाहाची बंदी करूनच समाज थांबला नाही, तर असें वैधव्य सक्तीने तिच्यावर लादून त्याने त्या स्थितींतलें तिचें जीवनहि नरकप्राय करून टाकलें, यांची आगरकरांना भयंकर चीड येते. विधवा स्त्रीला समाज अपवित्र मानतो, तिचें दर्शन हा अपशकुन मानतो; आणि तिच्या दुःखांत तिला सहानुभूति दाखविण्याऐवजी, तिच्यां कर्मानेच ती आपत्ति ओढवली, असें म्हणून तिच्या दुःखावर डागण्या देतो. इतकी क्रूरता, इतका अमानुषपणा जगांत दुसऱ्या कोठेहि सापडणार नाही. विधवेला समाजजीवन इतकें असह्य करून टाकतो की, आगरकरांच्या मतें त्यामुळेच अनेक स्त्रिया सती जाण्यास सिद्ध होतात. ते म्हणतात, जिचा नवरा मेला तिचें होईल तितक्या उत्तम रीतीने संगोपन करण्याची उदार चाल आमच्या देशांत असती तर सहगमनाची रूढि येथे कधीच न पडती; इतकेंच नव्हे, तर पतिवियोगामुळे एकाएकी प्राण सोडणारी किंवा आत्महत्या करणारी स्त्री देखील कधीहि दृष्टीस न पडती.
 (६) पुनर्विवाह - असंमत वैधव्य, पुनर्विवाहबंदी ही रूढि आगरकरांना बालविवाहाइतकीच घातक वाटत असली तरी त्यांनी वैधव्य किंवा पुनर्विवाह यासंबंधी स्वतंत्र व विस्तृत असें विवेचन केलेलें नाही. पण विष्णुशास्त्री पंडित यांनी या बाबतीत जे प्रयत्न केले त्यांचा आगरकरांनी गौरव केला आहे. त्यावरून या विषयासंबंधी त्यांचीं मतें काय होतीं याची सहज कल्पना येते. विष्णुशास्त्री यांनी प्रथम पुनर्विवाह सशास्त्र आहे, धर्मवचनांचा त्याला आधार आहे हें सिद्ध करण्यासाठी प्रमाणे गोळा केलीं व याविषयी कोणांस शंका असेल तर त्यांनी वादास उभे राहवें, अशा अर्थाचे जाहीरनामे शहरोशहरीं लावले. पण कोणीहि वादास आलें नाही. तेव्हा मग शास्त्रीबुवांनी पुनर्विवाहोत्तेजक मंडळीतर्फे सोळा वर्षांच्या एका विधवेचा पुनर्विवाह घडवून आणला. या वेळीं "तुमच्या छापखान्यास आम्ही आग