सुधारणा -अग्रक्रम व मार्ग । १६३
महत्त्वाची मानणारेहि पुष्कळ पंडित तिकडे होते. त्यांच्या मतें सोळाव्या शतकांत युरोपांत जी धर्मक्रांति झाली, तिच्यामुळेच तो देश विलक्षण सुधारला, त्या धर्मक्रांतीसाठी अनेक विचारी पुरुषांनी पुष्कळ यातना भोगल्या, पण आपला निश्चय ढळू दिला नाही. त्यांच्या त्या दृढ निश्चयामुळेच अलीकडील बहुतेक राजकीय. सुधारणा झाल्या आहेत.
या तीन पक्षांत आगरकरांना मान्य असा पक्ष म्हणजे गृहसुधारणा ज्यांना सर्वश्रेष्ठ वाटते अशा विद्वानांचा. त्यांच्या मतें कुटुंबे म्हणजे राष्ट्राचे मुख्य घटक असल्यामुळे त्यांची सुधारणा झाल्यावाचून राष्ट्राची सुधारणा किंवा राजकीय सुधारणा होणें शक्य नाही. आगरकरांना ही विचारसरणी मान्य होती ते म्हणतात, 'ज्या देशांतील कुटुंबांत गुलामगिरी व क्रौर्य यांचा अंमल जारीने गाजत आहे, त्या देशांतील राज्यपद्धतीत ते दुर्गुण पूर्णपणे प्रतिबिंबित झालेच पाहिजेत व त्यामुळे त्या राष्ट्रास विकलता आलीच पाहिजे." त्यांच्या मतें हिंदुस्थानांतली सामाजिक व धार्मिक स्थिति चांगली नव्हती म्हणूनच समाज दुर्बल झाला व त्याचें स्वातंत्र्य नष्ट झालें.
पारतंत्र्य अनुकूल
सामाजिक सुधारणेला आगरकरांनी अग्रक्रम दिला त्याचे आणखी एक कारण हें की, त्यांच्या मतें पारतंत्र्य हें अशा सुधारणांना जितकें अनुकूल असतें, तितकें स्वातंत्र्य नसतें. परकीय सरकार या देशांतील सामाजिक व धार्मिक सुधारणांविषयी उदासीन असतें; सुधारकांना तें प्रोत्साहन देत नाही किंवा विरोधहि करीत नाही. राजकीय सुधारणांच्या बाबतींत मात्र तें जागरूक असतें; आणि प्रसंग पडेल तेव्हा त्यांना कसून विरोध करतें. स्वतंत्र देशांतील राज्यकर्ते व प्रजा यांचा धर्म एकंच असल्यामुळे सरकारी अधिकारी सामाजिक व धार्मिक सुधारणांना बहुधा प्रतिकूल असतात; बहुतेक अधिकारी जुन्या मतांनाच अनुकूल असतात. त्यामुळे स्वतंत देशांत नवीन विचार प्रसृत करणें व नवे आंचार रूढ करणें फार कठीण असतें.
पण गेल्या शतकांत भारताच्या समाजस्थितीसंबंधी इंग्रजांनी जें धोरण अवलंबिलें होतें, त्यावरून आगरकरांचे वरील मत बरोबर दिसत नाही. पाश्चात्त्य विद्यांचा भारतांत प्रसार होऊन येथील लोकांची सामाजिक उन्नति व्हावी यासाठी कित्येक इंग्रज अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. ते कौटुंबिक व स्त्रीविषयक सुधारणांना अनुकूल होते. सतीची चाल इंग्रजांनीच बंद केली; पण जातिभेद, अस्पृश्यता, उच्चनीचत्व, हे सामाजिक दोष नाहीसे करणें इंग्रजांच्या हिताचे नसल्यामुळे त्यांनी तसा प्रयत्न केला नाही; उलट ते वाढवण्याचाच प्रयत्न केला. फोडा व झोडा हीच त्यांची नीति होती. हिंदु समाजांतील भेद जेवढे विकोपाला जातील तेवढे त्यांना हवे होते. हिंदु- मसलमानांचे दंगे होऊन, त्यांची एकजूट होणें अशक्य ठरांवें अशीच त्यांची इच्छा होती. देशांतील जनतेंत जितकी यादवी वाढेल तितकें तिच्यावर राज्य करणें सोपें