Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६२ । केसरीची त्रिमूर्ति

राजकीय स्वातंत्र्य होते; पण सामाजिक व धार्मिक स्थिति असावी तशी नव्हती म्हणून तें स्वातंत्र्य गेलें, असें अनेक लेखांत त्यांनी म्हटल्याचे वर सांगितलेच आहे. शिवाय कायद्याने सामाजिक सुधारणा करण्यास त्यांचा मुळीच विरोध नव्हता. इतकेंच नव्हे तर कांही रूढि कायद्याच्या साह्यानेच तत्काळ नष्ट केल्या पाहिजेत, असें त्यांचें मत होतें. यामुळे सामाजिक सुधारणा आधी झाल्या पाहिजेत या पक्षाच हिरिरीने पुरस्कार करण्यासाठी त्यांनी लेखणी उचलली व आपल्या सर्व सामर्थ्यानिशी प्रतिपक्षावर हल्ला केला. या वादासंबंधी 'सुधारकां'त त्यांनी अनेक लेख लिहून विरुद्ध पक्षाचें खंडन व स्वमताचें मंडन केलें.
 विरुद्ध पक्षाचें मत असें होतें की, आपण आपले स्वातंत्र्य पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न प्रथम केला पाहिजे. स्वातंत्र्य हे सर्वांनाच प्रिय असल्यामुळे ते मिळविण्याच्या बाबतींत लोकांमध्ये मतभेद असण्याचा संभव नाही. त्यामुळे सर्व लोक संघटितपणें तसा प्रयत्न करतील, असें त्या पक्षाच्या पुढाऱ्यांना वाटत होतें. सामाजिक सुधारणांच्या बाबतींत मान मतभेदाला बरीच जागा होती; किंबहुना सुधारणेला विरोध करणारेच फार लोक होते. त्यामुळे समाजांत कलह उत्पन्न होऊन, स्वातंत्र्यासाठी जे संघटित प्रयत्न व्हायला हवेत ते होणार नाहीत असें भय त्या पक्षाला वाटत होतें. म्हणून सामाजिक सुधारणेच्या मागे न लागतां आधी एकदिलाने स्वातंत्र्यासाठी चळवळ केली पाहिजे असें त्यांचे मत होतें.
तीन पक्ष
 या प्रश्नाविषयी अनेक निरनिराळीं मतें प्रचलित होतीं. शरीराच्या अवयवांचे दृष्टान्त त्या त्या मतांच्या पुष्टीसाठी सांगितले जात. कांही लोकांचें असें म्हणणें होतें, की शरीराचे व्यापार नीट चालण्यासाठी ज्याप्रमाणें मेंदूचें कार्य व्यवस्थित चालायला हवें, त्याप्रमाणे समाजशरीर नीट चालण्यासाठी त्याच्या मेंदूच्या जागी असणारी राज्यव्यवस्था चांगली असायला हवी; म्हणून राजकीय सुधारणा प्रथम हातीं घेतली पाहिजे. दुसऱ्या कांही लोकांच्या मतें शरीराचें आरोग्य हृदयाच्या बळकटीवर अवलंबून असतें आणि धर्म म्हणजे समाजपुरुषाचें हृदयच होय; म्हणून समाजाच्या स्वास्थ्यासाठी धर्मसंशोधन हे आपले आद्य कर्तव्य होय. आणखी कांही लोकांचें म्हणणें असें की, शरीरांत पचनेंद्रियांचें स्थान श्रेष्ठ आहे, अन्नाचे पचन होऊन सर्व शरीराचें पोषण करणारा द्रव उत्पन्न होतो तो पचनेंद्रियामुळे, आणि समाजरूपी शरीरांत तेंच महत्त्वाचे कार्य गृहाचार किंवा कुटुंबव्यवस्था करीत असते. कुटुंबव्यवस्था जितकी चांगली असेल तितकी समाजव्यवस्थाहि चांगली राहते; म्हणून प्रथम कुटुंबस्थिति सुधारली पाहिजे. अशा प्रकारे कोणी राजकीय, कोणी धार्मिक, तर कोणी सामाजिक सुधारणेला अधिक महत्त्व देतात. न्या. तेलंग यांनी सामाजिक सुधारणेच्या अगोदर राजकीय सुधारणा झाली पाहिजे, असें प्रतिपादिलें होते. युरोपांतले बरेच विद्वान् त्याच मताचे होते. उलट धर्मसुधारणा अधिक