१६४ । केसरीची त्रिमूर्ति
जाईल, असा त्यांचा हिशेब होता. त्यामुळे ते सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या बाबतींत उदासीन होते, असें म्हणतां येणार नाही.
दुसरे असे की, इंग्लंड, जर्मनी, अमेरिका, जपान इत्यादि देश स्वतंत्र असूनहि त्या देशांतील सामाजिक व धार्मिक सुधारणांना राज्यकर्त्यांनी विरोध केला नाही. तेव्हा या सुधारणांना स्वातंत्र्य प्रतिकूल असतें व पारतंत्र्य अनुकूल असतें, हें खरें नाही.
अधिकार नाही
राजकीय सुधारणांच्या आधी सामाजिक सुधारणा कां केल्या पाहिजेत, हें सांगतांना आगरकर म्हणतात की, राजकीय सुधारणा मागण्याचा आपल्याला हक्कच नाही; कारण आपण स्त्री, शूद्र व अस्पृश्य यांना हीन लेखतों. त्यांच्या जीवनावर आपण असंख्य निर्बंध लादले आहेत, म्हणजे त्यांना दास्यांत ठेवलें आहे, हा त्यांच्यावर फार मोठा अन्याय केला आहे. स्वतःच्या बांधवांवर अन्याय करणाऱ्यांना दुसऱ्याजवळ न्याय मागण्याचा अधिकार नाही. महाराची सावली पडली असतांहि विटाळ मानणारे लोक "रंगावर कांही मनुष्याची पात्रापात्रता ठरत नाही," असें उच्चरवाने प्रतिपादून गोऱ्या लोकांसारखा दर्जा आपल्याला मिळावा, असें म्हणू लागले, तर त्याला कोणीहि किंमत देणार नाही. गोऱ्या लोकांकडून समान वागणूक मिळायला हवी असेल तर आपणहि अस्पृश्यांना समानतेने वागवलें पाहिजे. याचाच अर्थ असा की, सामाजिक सुधारणा आधी केल्या पाहिजेत.
खरे मत
राजकीय सुधारणांच्या आधी सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत असा जरी आगरकरांचा आग्रह असला, तरी सर्व सुधारणा एकदमच व्हाव्या, असें त्यांचें खरें मत होतें. समाजाच्या प्राथमिक अवस्थेत त्याचे राजकीय, सामाजिक व धार्मिक आचार फारसे भिन्न नसतात. त्या सर्व प्रकारच्या आचारांची सुधारणा होत जाते तेव्हाच तो समाज सुधारला, असें म्हणतां येतें. विकसित अवस्थेतल्या समाजांत राजकीय, सामाजिक व धार्मिक असे भिन्न भिन्न आचार व नियम असले, तरी ते केवळ व्यवस्थेसाठी असतात. त्या सर्वांची एकसमयावच्छेदेकरून सुधारणा होत जाणें म्हणजेच तो समाज सुधारणें होय. भारतांत पाश्चात्त्य विद्येचा प्रसार झाल्यामुळेच सुधारणेचे वारे वाहूं लागलें. राजकीय सुधारणांसाठी राष्ट्रसभेची स्थापना झाली, तशी सामाजिक सुधारणांसाठी सामाजिक परिषद् अस्तित्वांत आली; पण जुन्या मताच्या लोकांना राष्ट्रसभेचें राजकीय कार्य जसें मान्य होतें, तसें सामाजिक परिषदेचें कार्य पसंत नव्हतें. रानडे, तेलंग प्रभृति नेत्यांना पाश्चात्त्य ज्ञानामुळे सर्वांगीण सुधारणेची महती पटली होती, आणि ते राजकीय सुधारणेप्रमाणेच सामाजिक सुधारणांचाहि पुरस्कार करीत होते. पण जीर्णमतवादी लोक त्यांच्या सामाजिक सुधारणांविषयक विचारांची टवाळी करीत. आगरकरांनी अशा लोकांची गणना मूर्खात केली असून, त्यांना स्पष्ट इशारा दिला आहे की, त्यांनी कितीहि असंबद्ध