Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुधारणा - अग्रक्रम व मार्ग । १६१

तिचें धोरण
 एकंदर काँग्रेसची वृत्ति अशी असली तरी न्यायमूर्ति रानडे यांच्यांसारखे विचारी लोकहि काँग्रेसमध्ये होते. त्यांनी राजकीय सुधारणांबरोबर सामाजिक सुधारणांचाहि पुरस्कार केला; पण काँग्रेसमध्ये ती चळवळ न आणतां त्यांनी त्यासाठी स्वतंत्र अशी सामाजिक परिषद् ही संस्था स्थापन केली. काँग्रेसतर्फे सामाजिक सुधारणांची चळवळ न करण्याचें कारण उघड होतें. काँग्रेसमध्ये हिंदु मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी इत्यादि सर्व धर्मांचे लोक होते, व त्या प्रत्येक धर्माच्या अनुयायांचे सामाजिक प्रश्न वेगळे होते. बालविवाह, विधवाविवाहबंदी हे प्रश्न खिश्चन समाजांत नव्हते. पारशी, ख्रिश्चन या समाजांत स्त्री-शिक्षणाला तसा विरोध नव्हता. मुस्लिम समाज या सर्व दृष्टींनी फार मागासलेला होता, पण सामाजिक सुधारणेचें त्याला हिंदूंपेक्षाहि जास्त वावडें होतें. शिवाय दुसरें असें की, एका धर्माच्या सभासदाने अन्य धर्माच्या धार्मिक वा सामाजिक दोषांवर टीका करणें व त्यांत सुधारणा सुचविणें हें कोणालाच सहन झाले नसतें. स्वधर्मीयाने केलेली धार्मिक आचारावरची टीकाहि तेव्हा कोणाला रुचत नव्हती, मग अन्यधर्मीयांची टीका कशी रुचणार? पण काँग्रेसमध्ये तो विषय आल्यावर तशी टीका होणे अपरिहार्यच होतें. म्हणून राजकीय व आर्थिक विषयांखेरीज अन्य कोणतेहि विषय काँग्रेसमध्ये आणूं नयेत असा विचार सर्वांनीच संमत केला.
वादाचे स्वरूप
 पण काँग्रेसमध्ये सामाजिक सुधारणांचा प्रश्न आणला नाही तरी ती चळवळच करूं नये हें पुष्कळांना मान्य नव्हतें व त्यांनीच वर सांगितल्याप्रमाणे सामाजिक परिषदेची स्थापना केली होती; आणि प्रारंभी काँग्रेसच्या मंडपांतच त्या परिषदेचें अधिवेशन भरत असे; पण त्यांतहि पुढे विरोध होऊं लागला. कारण सामाजिक सुधारणेला मुळांतच विरोध असणारा एक पक्ष त्या वेळीं निर्माण झाला होता. त्या पक्षाचीं मतें व विचारसरणी यांचें विवेचन मागे केलेलेच आहे.
 यांतच आणखी एका वादाची भर पडली. मलबारीशेठ या पारशी गृहस्थाने बालविवाह व असंमत वैधव्य या हिंदु सामाजांतील रूढि कायद्याने बंद कराव्या, असा पक्ष मांडला व तशी चळवळहि सुरू केली. याची सतानत हिंदूंना दोन कारणांनी चीड आली. एका परधर्मीय गृहस्थाने आपल्या सामाजिक बाबतींत हस्तक्षेप करावा हें त्यांना सहन झाले नाही; आणि कायद्याने समाजसुधारणा करावी हेहि त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे मूळ वादाला आणखी फाटे फुटले व उभय पक्षांत अत्यंत कटुता निर्माण झाली.
 आगरकरांचा राजकीय सुधारणांना विरोध नसला तरी सामाजिक सुधारणा मागे पडाव्या हें त्यांना मान्य नव्हतें. सामाजिक सुधारणा झाल्यावांचून राजकीय सुधारणांना अर्थच प्राप्त होणार नाही, असें त्यांचें ठाम मत होतें. मागे आपल्याला
 के. त्रि. ११