पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवभारताची निर्मिति । पंधरा

 लोकहितवादींनी स्त्रीजीवनाविषयी अनेक क्रांतिकारक विचार सांगितले आहेत. स्त्रियांना पुरुषासारखेच सर्व क्षेत्रांत अधिकार असावेत, स्त्रीचा विवाह प्रौढपणी व्हावा, एवढेच नव्हे तर खरें म्हणजे तिचें स्वयंवर व्हावें हेंच प्रशस्त होय, असें त्यांनी प्रतिपादिले आहे; आणि या सुधारणांच्या आड धर्मशास्त्र येत असेल तर त्यास बाजूस सारून सुधारणा केली पाहिजे, असा स्पष्ट उपदेशहि त्यांनी अनेक ठिकाणी केला आहे.
 भांडारकर, रानडे, स्वामी दयानंद, त्यांचे शिष्य लाला हंसराज, गुरुदत्त विद्यार्थी, लाला लजपतराय ह्या थोर नेत्यांनीहि स्त्री-शिक्षण, प्रौढ विवाह, व स्त्रियांचें आर्थिक स्वातंत्र्य यांसाठी अखंड परिश्रम करून लोकमताला नवीन वळण लावलें. दयानंदांच्या 'सत्यार्थप्रकाशांत' बाल-विवाहाचा निषेध केलेला असून विधवा-विवाहास अनुमति दिलेली आहे.
भौतिक ज्ञान
 ह्या सर्व सुधारणांचा पाया म्हणजे भौतिकज्ञान हा होय. समाजांतली विषमता नष्ट करण्यासाठी, घातक रूढींच्या बंधनांतून त्याला मुक्त करण्यासाठी समाजांत भौतिक ज्ञानाचा प्रसार केला पाहिजे, त्या ज्ञानावांचून समाजाची उन्नति होणें शक्य नाही, याविषयी या भारतीय समाजसुधारकांच्या मनांत मुळीच संदेह नव्हता. म्हणूनच त्या ज्ञानासाठी त्यांनी अट्टाहास चालविला होता. १८२३ साली सरकारने शिक्षण-प्रसारासाठी कांही रक्कम मंजूर केली; पण तिचा विनियोग व्याकरण, वेदान्त, न्याय वगैरे जुनीं शास्त्र शिकविणाऱ्या संस्कृत पाठशाळेसाठी करण्याचें ठरविलें. त्या योजनेला राममोहन राय यांनी विरोध केला व "ती रक्कम पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारासाठीच खर्च केली जावी", असा अर्ज केला. त्या अर्जांत, "गणित, रसायन, शरीरशास्त्र इत्यादि ज्या शास्त्रांना पूर्णत्वास नेल्यामुळे युरोपियन राष्ट्र जगाच्या पुढे गेलीं तीं शास्त्रे आम्हांस शिकवावी; जुनें व्याकरण किंवा तत्त्वज्ञान यांचा समाजाला कांही उपयोग नाही, येथे उणीव आहे ती भौतिक विद्येची आहे", असे विचार त्यांनी सांगितले आहेत. यावरून ग्रंथप्रामाण्याचे युग संपून अनुभवगम्य व बुद्धिगम्य ज्ञानाचे युग सुरू व्हावें याविषयी राममोहन यांना किती तळमळ लागून राहिली होती, तें दिसून येतें.
 लोकहितवादींना समाजांतील अज्ञानाबद्दल फारच संताप येत असे; कारण येथल्या पढिक विद्वानांना, शास्त्री पंडितांना नवीन जगाची मुळीच माहिती नव्हती. ज्ञान मिळविण्याचा प्रयत्नच त्यांनी केला नाही. उलट अज्ञानांत त्यांना भूषण वाटे. आपले जुने ग्रंथ हेच त्यांना सर्वश्रेष्ठ वाटत होते. आणि त्यांचें पाठांतर हीच त्यांची विद्या होती. त्यासाठीच लोकहितवादींनी त्यांना बैल, टोणपे अशा शिव्या दिल्या आहेत. पुराणांनी भारताला दैववाद, शब्दप्रामाण्य व जगाविषयी भ्रांत कल्पना शिकविल्या, असें त्यांचें मत होते. या शब्दप्रामाण्यावर व अंधश्रद्धेवर त्यांनी प्रखर