पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सोळा । केसरीची त्रिमूर्ति

टीका केली आहे. हिंदु लोकांची सुधारणा व्हायची तर त्यांना मुख्य म्हणजे विद्या हव्या; पण त्या विद्या पुराणांतल्या नव्हे, तर पाश्चात्त्य भौतिक विद्या. समाजाच्या पायांतल्या सप्तशृंखला तोडल्या पाहिजेत, हा विचार लोकहितवादींनी शंभर-सव्वाशे वर्षापूर्वी सांगितला, यांतच त्यांचें असामान्य मनोधैर्य दिसून येतें.
 दादोबा पांडुरंग यांनीहि महाराष्ट्रांत याच तऱ्हेचे विचार प्रसृत केले. भौतिक ज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी 'स्टूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी' ही संस्था दादाभाईंच्या सहकार्याने १८४८ साली काढली. या संस्थेच्या मराठी शाखेचे ते अध्यक्ष होते व दादाभाई नौरोजी हे गुजराती शाखेचे अध्यक्ष होते. इंग्रजी राज्यांत हिंदी लोकांचा व्यापार बुडाला व प्रजा निर्धन झाली याचें कारण, दादोबांच्या मतें, लोकांचें अज्ञान व विद्यारहितपणा हें होतें. भौतिक शास्त्रांचा अभ्यास करणें, विद्या व कला यांचें ज्ञान संपादन करणें, हाच उत्कर्षाचा उपाय म्हणून त्यांनी सांगितला आहे.
 न्या. मू. रानडे हे गेल्या शतकांतील या समाजधुरीणांचे अग्रणी होत. अलौकिक प्रज्ञा, बुद्धिमत्ता, राष्ट्रनिष्ठा, चारित्र्य अशा अनेक गुणांनी ते संपन्न होते. मानवी प्रतिष्ठेचें पुनरुज्जीवन हें त्यांच्या सर्व सुधारणेचें आदि-सूत्र होतें. "आपल्या अधःपाताचें मूळ कारण म्हणजे आपणावरची सर्व बंधनें ही विवेकबंधने नसून तीं बाह्य व जड बंधनें आहेत, हें होय. त्यामुळे आपलीं मनें बाल्यावस्थेतच राहिली. स्वयंशासन व आत्मसंयमन यांमुळे येणारी मानवी प्रतिष्ठा आपल्याला आलीच नाही." हे त्यांचे उद्गार प्रसिद्धच आहेत. समाजजीवनाचें असें एकहि क्षेत्र नाही, की ज्याचें पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. लो. टिळकांनी म्हटल्याप्रमाणे, मुतवत् झालेल्या, थंड गोळा झालेल्या महाराष्ट्राला त्यांनीच प्रथम सचेतन केलें, आणि त्याला उत्कर्षाचा मार्ग आखून दिला. यामुळेच नवभारताच्या निर्मितींत त्यांचें श्रेय फार मोठें आहे.
 अशा रीतीने केसरीच्या त्रिमूर्तीने आपल्या कार्याला प्रारंभ करण्यापूर्वीच या देशांत क्रांतीचें तत्त्वज्ञान सांगितलें गेलें होतें. त्यांना ज्या राष्ट्र-मंदिराची उभारणी करावयाची होती त्याची पायाभरणी ही अशी आधीच झाली होती. त्या पायावर या त्रिमूर्तीने मंदिराची उभारणी कशी केली तें आता पाहवयाचें आहे.