Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकरांना हिंदु समाज कसा दिसला? । १४३

कार्यकारणभावाचें आकलन नाही, इतिहास लिहिण्याची बुद्धि नाही, असें विष्णुशास्त्री म्हणत असत. हें मागे सांगितलेंच आहे. हिंदुस्थानच्या प्राचीन परंपरेचें ते गुणगान करीत असले तरी शिवछत्रपतींच्या पूर्वी अनेक शतकें या देशाचें प्राचीन वैभव नष्ट झालें होतें व प्राचीन आर्य लोकांचा धर्म, विद्या, आचार, इत्यादिकांचा सर्वथा लोप होण्याचा समय आला होता, असें मत त्यांनी वक्तृत्व या निबंधांत मांडलेलें होतेंच.
 हिंदुस्थानच्या शिलावस्थेविषयी जसें दोघांचे एकमत होतें तसेंच पाश्चात्त्य विद्येच्या महत्त्वाविषयी व पाश्चात्त्य लोकांच्या गुणांविषयी व संस्थांविषयीहि त्यांचे जवळ जवळ एकमत होतें. त्यांचेंच आपण अनुकरण केलें पाहिजे. त्यांना गुरु केलें पाहिजे असें विष्णुशास्त्री यांनी देशाभिमान, विद्याभिरुचि, उद्योगशीलता संपत्तीचा उपभोग, व्यक्तिस्वातंत्र्य यांचे विवेचन करतांना ठायीं ठायीं म्हटलें आहे. आगरकरांचे त्यांविषयीचे विचार येथे मांडलेच आहेत. पाश्चात्त्य शिक्षण व तेथील नवीन कल्पना यांत मनुष्य-सुधारणेच्या अत्यवश्य तत्त्वांचा समावेश झाला आहे, म्हणून ज्यांना लयास जावयाचें नसेल त्यांनी त्यांचें अवलंबन केलेंच पाहिजे, असें त्यांनी म्हटले आहे.
 हें एवढें विचारसाम्य पाहून मोठें आश्चर्य वाटतें. आश्चर्य अशासाठी की, रोगाचे निदान व त्यावरील उपाय या दोन्ही बाबतींत इतकें साम्य असतांना भारताच्या अवनतीच्या मीमांसेच्या बाबतींत त्यांच्यांत दोन ध्रुवांइतकें अंतर असावें! सामाजिक व धार्मिक आचार-विचारांमुळे आम्हांस पारतंत्र्य आलें, असें आगरकर म्हणतात; तर या पारतंत्र्यामुळे आमची अवनति झाली असें विष्णुशास्त्री म्हणतात. शिवाय उन्नति-अवनति ही चक्रनेमिक्रमाने होत असते असेंहि विष्णुशास्त्री यांनी अनेक ठिकाणीं म्हटलें आहे. याच भिन्न दृष्टिकोणामुळे सुधारणाविरोधक असे जे नवे विद्वान् त्यांच्यावर आगरकर कडक टीका करतात, तर विष्णुशास्त्री सुधारक व सुधारणा यांचा तीव्र उपहास करतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुस्थानच्या अवनतीविषयी पुढे जीं मतें मांडलीं बव्हंशीं तशींच मतें आगरकरांनी मांडलेली आहेत. रोटीबंदी, बेटीबंदी, व्यवसायबंदी इत्यादि सप्तशृंखला आपणच आपल्या पायांत ठोकून घेतल्यामुळे आपला अधःपात झाला, आणि पुढे स्वातंत्र्य प्राप्त झालें तरी या बेड्या जर आपण तोडल्या नाहीत तर तें टिकणार नाही, असें सावरकर सांगत असत. समाजरचनेविषयी हेंच तत्त्वज्ञान या शतकाच्या पूर्वार्धात आपल्या नेत्यांनी मान्य केलें म्हणूनच हा समाज संघटित व स्वातंत्र्यलढा देण्यास समर्थ झाला हे उघड आहे. असो.
 या ग्रंथांत केसरीच्या त्रिमूर्तीच्या कार्याचें विवेचन करावयाचे असल्यामुळे त्या त्रिमूर्तीच्या तत्त्वज्ञानांतील सास्य-वैषम्य पाहत पाहत असें पुढे जाणें हें उद्बोधक होईल