Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-२-

व्यक्तिस्वातंत्र्य



व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप
 समाजाला अशी शिलावस्था येण्याचें, आगरकरांच्या मतें, मुख्य कारण म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप हें होय. हिंदु लोकांच्या मनावर मध्ययुगांत नाना प्रकारची बंधने घातलीं गेल्यामुळे कोणाला आचारस्वातंत्र्य राहिलें नाही, उच्चार स्वातंत्र्य राहिलें नाही आणि विचारस्वातंत्र्यहि राहिलें नाही. सर्व समाजावर श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्माची सर्वंकष सत्ता चालत होती. वेदप्रामाण्य म्हणजे वेदवाक्यांचे बंधन होतें; कर्मवाद म्हणजे पूर्वजन्मांतील कर्माचें बंधन होते; स्मृतींचें म्हणजे धर्मशास्त्राचें बंधन; वर्णव्यवस्थेचीं सामाजिक बंधनें, तशींच जातिबंधनें, अशी असंख्य बंधनें अगदी अनुल्लंघनीय होतीं. तीं बंधनें न मानावीं तर जातिबहिष्काराची भीति होती. राजकीय बंधनें होतीं तीं वेगळींच, कारण राजाची सत्ता अनियंत्रित होती. त्याच्या मर्जीप्रमाणे व लहरीप्रमाणे सारी प्रजा गुलामी जीवन कंठीत होती. अशा साचेबंद, नियंत्रित जीवनांत व्यक्तीला स्वतंत्रपणें विचार करावयास अवसरच राहत नाही. शेकडो वर्षे अशा अवस्थेत राहिल्यामुळे माणसांचें स्वतंत्र व्यक्तित्व हळूहळू खुरटून गेलें व शेवटीं नष्ट झालें. त्याचा परिणाम असा झाला की, समाजांत नवीन विचार, नवीन कल्पना यांचा उदय होणे थांबलें, समाजाची प्रगति थांबली व अधोगति सुरु झाली.
 अशा अवनत समाजाचा उत्कर्ष व्हायला हवा असेल, तर प्रथम व्यक्ति निर्माण केली पाहिजे, असा आगरकरांचा सिद्धान्त आहे. 'सुधारक काढण्याचा हेतु' या निबंधांत ते म्हणतात, "समाजाचें कुशल राहून त्यास अधिकाधिक उन्नतावस्था येण्यास जेवढी बंधनें अपरिहार्य आहेत, तेवढीं कायम ठेवून बाकी सर्व गोष्टींत