Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४२ । केसरीचों त्रिमूर्ति

मानी लोकांचा पक्ष घेतला," असा आगरकरांचा गैरसमज झाला होता. स्वाभिमान व स्वराज्यनिष्ठा जागृत करून स्वातंत्र्य-संपादनासाठी अखंड प्रयत्न करणें हेंच परतंत्र देशाचें परम कर्तव्य होय; सामाजिक सुधारणा नंतर करतां येईल, असें टिळकांचें ठाम मत होते; पण तें आगरकरांना मान्य नव्हतें. टिळकांना ते ढोंगी समजत होते आणि त्यांच्यावर सतत टीका करीत होते. "जे कोणत्याहि मिषाने लोकाग्रणी म्हणून मिरवूं लागले असतील, त्यांनी लोकांची मर्जी संपादण्यासाठी त्यांच्या दुराग्रहांचें मंडन करणें अत्यंत लज्जास्पद होय." हे आगरकरांचें विधान टिळकांना उद्देशूनच केलेलें होतें. त्यापुढे जाऊन आगरकरांनी सनातनी लोकांना बजावलें की, "हे तुमचे पुढारी नव्हेत. टिळक व जिनसीवाले हे मनाने सुधारकच आहेत. त्यांना स्त्री-शिक्षण, बालविवाह निषेध, वपन निषेध, पुनर्विवाह वगैरे सुधारणा व्हायला हव्या आहेत. मात्र त्या कायद्याने लोकांवर लादण्याला त्यांचा विरोध आहे एवढेच. तेव्हा लोकांनी त्यांना आपले पुढारी मानूं नये. साधनें आणि मार्ग यांबद्दल त्यांचें मत भिन्न असलें तरी ते आमच्यासारखेच सुधारणावादी आहेत. त्यांच्या नादीं तुम्ही लागाल तर फसाल."
 हिंदु समाजाला शिलावस्था आली आहे, त्याचें सारें व्यक्ति-जीवित्व व राष्ट्र-जीवित्व, ठशांत घालून ओतलेल्या पोलादासारखें, किंवा निबिड शृंखलाबद्ध बंदिवानासारखें, अथवा उदकाच्या नित्य आघाताने कठीण झालेल्या लाकडासारखें किंवा हाडकासारखें शेकडो वर्षे होऊन राहिलें आहे, असें आगरकरांनी सुधारकाच्या पहिल्या अंकांतच म्हटलें आहे. त्यांना हिंदु समाज कसा दिसला हें यावरून स्पष्ट होईल. त्यांनी 'केसरी'साठी लेखणी उचलली तेव्हाच हिंदु समाजाविषयी त्यांचें हें मत झालें होतें. पुढे सतत केलेल्या चिंतनामुळे तें अगदी निश्चित झालें आणि 'सुधारक' पत्राला प्रारंभ करतांनाच त्यांनी ते समाजाला सांगून टाकलें.
 अशा या समाजाच्या अंगीं चैतन्य आणण्यासाठी कोणती उपाययोजना केली पाहिजे तेंहि प्रारंभापासूनच त्यांच्या मनांत सुनिश्चित झालेलें होतें. या समाजाला शिलावस्था येण्याची त्यांनी केलेली कारणमीमांसा आणि ती नाहीशी होऊन पुन्हा तो प्रगतिपथावर येण्यासाठी त्यांनी सांगितलेली उपाययोजना यांचीच आता चिकित्सा करावयाची आहे.
 पण ती चिकित्सा करण्यापूर्वी एकदा जरा मागे वळून पाहूं आणि मग पुढे जाऊं. मागे वळून काय पाहवयाचें?
 विष्णुशास्त्री आणि आगरकर यांच्यांतील विचारसाम्य.
 हिंदुस्थानाला शिलावस्था आली आहे असे शब्द विष्णुशास्त्री यांनी वापरले नाहीत; पण त्यांनी येथल्या समाजाचे जे दोष दाखविले आहेत त्यांवरून त्यांचा भावार्थ तोच होता है स्पष्ट दिसतें. कारण आगरकरांना हिंदुस्थान जसा दिसला तसाच त्यांना दिसला होता. येथल्या लोकांना ज्ञानलालसा नाही, विद्याभिरुचि नाही.