पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवभारताची निर्मिति । तेरा

पराकोटी गाठली. "प्रजा हें एक कुटुंब आहे, असें मानून सर्वांनी कष्ट करावे व त्या कष्टांनी निर्माण झालेलें धन राज्याच्या कोठारांत भरूत ठेवावें व सर्व गावकऱ्यांच्या पोटास लागेल तसें द्यावें ", अशी व्यवस्था त्यांनी सांगितली आहे. "जातिभेद, मूर्तिपूजा व धर्माचीं ढोंगें यांचा नाश केला पाहिजे. गुणांवरून वर्ण व जाति ठरविल्या पाहिजेत", असे त्यांचें मत होतें.
सत्यशोधक समाज
 विषमता नष्ट करून समतेची प्रस्थापना करण्याचे गेल्या शतकांत जे प्रयत्न झाले, त्यांत म. ज्योतिराव फुले यांच्या उद्योगाचे महत्त्व विशेष आहे, कारण ते बहुजन समाजांतले होते. दलित समाजाचा आत्मप्रत्यय शेकडो वर्षांच्या संस्कारांमुळे नाहीसा झालेला असतो; आपण खरोखरच हीन आहों, अशी त्याच्या मनाची भावना झालेली असते. अशा वेळीं त्या समाजांतला व त्याचा अभिमान बाळगणारा कार्यकर्ता पुढे सरसावताच त्या समाजाच्या मनाचें मालिन्य नष्ट होतें व अन्यायाचा प्रतिकार करण्यास तो सिद्ध होतो. स्वजनांचा विरोध सोसूनहि ज्योतिबांनी अस्पृश्यांची शाळा चालविली व त्यांच्यासाठी स्वतःच्या घरापुढचा पाण्याचा हौद खुला केला. सत्यशोधक समाजाची स्थापना हें त्यांचे खरें सामाजिक कार्य होय. विषमतेवर आधारलेल्या वर्णजातिव्यवस्थेविरुद्ध खेड्यापाड्यांतील खालच्या वर्गांत असंतोष निर्माण करण्याचें मोठें कार्य त्या समाजाने केलें.
आर्यसमाज
 स्वामी दयानंदांनी स्थापन केलेल्या आर्यसमाजाने पंजाबांत समतेच्या दृष्टीने जें कार्य केलें, त्यालाहि फार महत्त्वाचे स्थान आहे. वेदपठणाचा अधिकार सर्व हिंदूंना आहे, हें तत्त्व प्रसृत करून, या समाजाने त्या अन्वये मागसलेल्या व अस्पृष्ट जातींनाहि समाजांत सामील करून घेतलें, आणि सर्व जातींत शिक्षणाचा प्रसार करून, त्यांच्यांत रोटीबेटी व्यवहार सुरू केला.
 कोणत्याहि प्रकारची विषमता ही समाजाला घातकच ठरते; पण त्यांतल्या त्यांत जातिभेदामुळे आलेली विषमता ही समाजाचें सर्व कर्तृत्वच नष्ट करून टाकते; कारण अशा समाजांत हीन जातीच्या लोकांना पराक्रम करण्यास स्फूर्ति येणेंच शक्य नसतें. आपण जें कर्तृत्व दाखवूं, त्याचें पुरेपूर फल आपल्याला मिळेल, ही खात्री असेल तरच मनुष्य श्रम करण्यास उद्युक्त होतो. गुणांप्रमाणे समाजांत स्थान निश्चित मिळेल ही भावना कर्तृत्वाची प्रेरणा देते. हीन गणलेल्या जातींना विषम समाजव्यवस्थेंत वरचें स्थान मिळण्याची कधीच शक्यता नसते, उत्कर्षाची संधि त्यांना मिळत नाही, म्हणून त्यांचे कर्तृत्व कुजत पडतें. म्हणूनच जातिभेद नष्ट करण्याच्या प्रयत्नाचें महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.