आगरकरांना हिंदु समाज कसा दिसला?
व युरोपियन लोक गोमांस खातात, तरी त्यांचा स्पर्श व सहवास आम्हांस चालतो मात्र महार, मांग, धेड यांची सावलीहि अमंगळ मानली जाते. हें सर्व विसंगत व असयुक्तिक आहे असें सांगून आगरकर म्हणतात, "श्रद्धाळू धार्मिकांस आपल्या धर्म- समजुती व त्यांवर अवलंबणारे आचार यांस बुद्धिवादाच्या प्रखर मुशीत घालण्याची छाती होत नाही. त्यांना अशी भीति वाटते की, ते हिणकस ठरल्यास, पुढे काय करावें?"
कर्मकांडात्मक धर्मांतला दुसरा मूर्खपणाचा आचार म्हणजे हिंदूंचा प्रेतसंस्कार. आगरकरांना तो फारच भयप्रद, अमंगळ व कष्टमय वाटतो. प्रेताला न्हाऊ घालणें, सवाष्ण स्त्रीच्या प्रेताला नवें पातळ नेसवून मळवट भरून तिची ओटी भरणें, तिरडीवरून प्रेत नेणें, स्मशानांत क्षौर करणें, प्रेतावर कणकीचे गोळे ठेवणें, गळकें मडकें पाण्याने भरून घेऊन चितेला प्रदक्षिणा घालणें; हे सर्व विधि त्यांच्या मतें बीभत्स आहेत; पण त्यांतील विधवेचें सक्तीने केशवपन करण्याची चाल त्यांना अत्यंत क्रूर व निर्दयपणाची वाटते. पतिव्रता स्त्रीने दुसऱ्याशीं बोलणें किंवा त्याच्याकडे पाहणेंहि पुरुषांना खपत नाही; पण पति मेला की लगेच त्याच्या विधवेला हे लोक न्हाव्या- बरोबर एका खोलीत कोंडून तिचे केस जबरदस्तीने काढायला लावतात! याचा त्यांना फारच संताप येतो. श्राद्धविधीविषयीहि आगरकरांना असाच तिरस्कार वाटतो. जिवंत मनुष्याला अन्नवस्त्र व उपभोगाचे पदार्थ लागतात, तेच मेलेल्या माणसाला अर्पण करण्यांत काय अर्थ आहे? त्याचा अशरीरी आत्मा त्या पदार्थांचा उपभोग कसा घेणार? आगरकर आपल्या 'प्रेतसंस्कार' या लेखांत म्हणतात "तुम्ही जे प्रेतविधि करतां त्यांवरून जिवंत मनुष्य आणि मेलेला मनुष्य यांतील भेद तुम्हांला कळत नाही, असें म्हणणें भाग आहे."
मेलेल्या मनुष्याच्या आप्तांना क्षौर करावें लागतें व जें अशौच पाळावें लागतें, त्यावरहि आगरकरांनी टीका केली आहे. ते म्हणतात, "समुद्रपर्यटन, अभक्ष्य भक्षण वगैरे दोषांस क्षौरादिकांचीं प्रायाश्चित्तें सांगितली आहेत. व ज्या अर्थी प्रेताच्या मुलाला व बायकोलाहि तेंच प्रायश्चित घ्यावें लागतें त्या अर्थी बाप किंवा नवरा मरणें हें मुलाच्या व बायकोच्या हातून घडणारें दंडनीय पातक आहे, असाच आमच्या लोकांचा म्हणजे आम्हां सर्वश्रेष्ठ म्हणविणाऱ्या अत्यंत मूर्ख ब्राह्मण लोकांचा समज असला पाहिजे हे उघड आहे. विटाळ म्हणजे काय हें तुम्हांला बिलकुल कळत नाही असें वाटतें. जर तें तुम्हांला कळत असतें तर सुतकाहून सोयराचा विटाळ तुम्ही अधिक दूष्य मानिला असता."
हिंदु समाजांत जे अनेक लज्जास्पद आचार रूढ होते, त्यांतील शिमग्याच्या सणाला आगरकरांनी पहिला क्रमांक दिला आहे. त्याविषयी 'पांचजन्याचा हंगाम' या निबंधांत प्रारंभीच ते म्हणतात, "इतका बीभत्स सण दुसऱ्या कोणत्याहि देशांत पाळला जात असेल, असें आम्हांस वाटत नाही. माघ शुद्ध पौर्णिमेपासून फाल्गुन वद्य