१३२ । केसरीची त्रिमूर्ति
पंचमीपर्यंत हिंदु धर्माने हिंदु लोकांस पशुतुल्य वर्तन करण्याचा पास दिला आहे!" त्या दिवसांत उनाड, टारगी पोरेंच काय, पण मोठे संसारी पुरुष देखील रस्तोरस्ती, अर्वाच्य उखाणे घेऊन बोंब मारीत हिंडत असत. होळी पौर्णिमेच्या दिवशी घरोघरी व चवाठ्यांवर होळी पेटवून तिला पांचजन्ययुक्त प्रदक्षिणा घालण्याचा प्रघात होता. तो एक धार्मिक विधीच मानला जात असे; पण तेवढ्याने हा सण पार पडत नसे. होळीच्या रानटी देवतेला खूष करण्यासाठी नंतरचे पांच दिवस जो धुडगूस चाले, तो तर फारच बीभत्स असे. होळीच्या राखेंत माती, शेण किंवा त्याहून घाण पदार्थ कालवून केलेल्या खातेऱ्याने एकमेकांना माखणें, तुटक्या केरसुण्या व फाटकी शिपतरें डोक्यावर घेऊन व गाढवावर बसवून त्या सोंगाची मिरवणूक काढणें, अचकट-विचकट लावण्या म्हणणे, बाजूच्या लोकांवर खातेरें उडवून त्यांच्या नांवाने पांचजन्य करणें व स्त्रियांची टिंगल करणें, असें पशुतुल्य वर्तन करायला कोणालाहि लाज वाटत नसे.
या सणांचे भक्त त्याचें समर्थनहि करतात. ते म्हणतात की, होळीच्या धुरामुळे मनुष्याला अपायकारक असे सूक्ष्म जंतु भरून जातात. बोंब मारण्यामुळे आगीच्या प्रसंगी चार माणसांना गोळा करून आग विझवण्याचा प्रयत्न कसा करावा त्याचें शिक्षण मिळतें. बीभत्स वर्तनाचेंहि असेंच समर्थन केलें जातें. मनुष्याच्या स्वभावांत ज्या वाईट वृत्ति व विकार असतात त्यांना नीतिनियमांमुळे कोंडून ठेवलेलें असतें. त्यांना केव्हा तरी असें मोकळे सोडलें नाहीं तर ते अनावर होऊन शेवटीं त्यांचा घातक परिणाम व्हायचा. पण आगरकरांना ही विचारसरणी मुळीच पसंत नाही. मनुष्याच्या विकारांना अशी वाट देण्याची गरज नाही हें सांगतांना ते म्हणतात, "मनुष्याच्या मनांतला दुर्वृत्तीचा अंकुर समूळ उपटण्याचा प्रयत्न केला नाही तर स्वल्प वयांत तो सारें अंतःकरण आपल्या विषारी विस्ताराने व्यापून टाकून सद्वृत्तींची वाढ बिलकुल होऊं देत नाही. तेव्हा शिमग्यासारखे सण नाहीसे करून टाकल्यास आमचें कोणत्याहि प्रकारे नुकसान होण्याचा संभव नाही. शिमग्यावांचून शिमग्यांतले निंद्य प्रकार समाजांत नित्य घडत असतात. आम्ही मात्र त्यांना धर्माच्या नावाने फाजील उत्तेजन देऊन आपले अधिक नुकसान करून घेत आहों."
सनातन धर्माभिमानी लोक या कर्मकांडालाच खरा धर्म मानतात. वास्तविक नीति व सदाचार हा खरा धर्म होय; पण त्याची परवा न करतां हे लोक तर्कशून्य आचारांनाच जास्त महत्त्व देतात. मांसाहार, मदिरापान, व्यभिचार, विश्वासघात, क्रूरपणा अशीं निद्य कर्मे करणारा मनुष्य रूढ आचार-धर्माचें पालन करीत असेल, तर तो यांना धर्मनिष्ठ वाटतो. त्याच्याशी अन्नोदक व्यवहार करण्यासच काय, पण त्याच्या अंगुष्ठाचें तीर्थ घेऊन आपल्या पापाचें क्षालन करून घेण्यास देखील ते तयार! पण सदाचारसंपन्न अशा ब्राह्मण किंवा प्रभू माणसाने शूद्राच्या हातचें पाणी घेतले किंवा ख्रिस्ती माणसाकडचा घोटभर चहा घेतला की लगेच त्याला