Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३० । केसरीची त्रिमूर्ति

काय?" असे उद्गार काढतात तेव्हा ते फार म्हणजे फारच रागावले आहेत, इतकेंच ध्यानांत घ्यावयाचें. कारण या देशांतल्या लोकांनी मोठमोठे पराक्रम केलेले आहेत हे त्यांनी पुढे याच लेखांत व अन्यत्रहि सांगितलेलें आहे.
 पण ही किरकोळ गोष्ट आहे. ब्रिटिश येण्यापूर्वी हजार-दीड हजार वर्षे हा देश अगदी लाजिरवाण्या अज्ञानांत बुडून राहिला होता याबद्दल शंकाच नाही; आणि पाश्चात्त्य भौतिक विद्यांचा अभ्यास करून आम्ही ज्ञानविज्ञानांत त्यांच्या बरोबरीस आल्यावांचून आमचा उत्कर्ष होणार नाही, हें त्यांचे म्हणणेंहि यथार्थच आहे.
कर्मकांडात्मक धर्म
 हिंदु समाजांत रूढ झालेले तर्कशून्य धार्मिक आचार हें त्याच्या शिलावस्थेचें दुसरें लक्षण होय. त्यांत सोवळें-ओवळें, प्रेतसंस्कार, शिमग्यांसारखे बीभत्स सण यांचा समावेश आगरकरांनी केला आहे. ब्राह्मण लोकांत सोवळ्याचें प्रस्थ फारच माजलें होतें. त्यांच्या कल्पनेप्रमाणे नवें कोरें वस्त्र विटाळत नाही. धूतवस्त्र सोवळ्यांत चालतें, पण तें लवकर विटाळते. रेशमी किंवा लोकरीचें वस्त्र सुती वस्त्रापेक्षा अधिक शुद्ध. त्याचें शुद्धत्व कशानेच बिघडत नाही. परटाकडची भाताची खळ लावलेलीं वस्त्रे एका शिंतोड्याने शुद्ध होतात. जेवणाखाण्याच्या बाबतींत तर सोवळेपणाचा फारच गोंधळ असतो. हरभऱ्याची डाळ आधी भिजवून मग वाटली तर ती निर्लेप, पण ती आधी दळून तिचें पीठ पाण्यांत घातलें तर मात्र खरकटें होतें. त्याचें पिठलें मुकटा नेसल्याशिवाय तोंडांत घालण्याची सोय नाही. भडबुंज्याकडचे पोहे खाता येतात, पण बाजारांतला भाजी-भात किंवा पावबिसकुट यांकडे ब्राह्मणाने पाहण्याची सोय नाही. प्रवासांत कोणाचाहि स्पर्श झालेले अन्न चालते, पण घरांत कुणबिणीने केलेली भाकरी मुळीच चालत नाही. हरणाचे किंवा वाघाचे कातडें फारच शुद्ध मानलें जातें. तें धार्मिक विधींत बसायला घेतात. पण गाय इतकी पवित्र मानलेली असून तिचें कातडें मात्र पवित्र नाही. सोवळें म्हणजे शुचिता असा अर्थ असतो तोंपर्यंत तें स्पृहणीय होय. पण वरील रूढ कल्पनांशीं स्वच्छतेचा कांही संबंधच नसतो. विटाळ- चांडाळाच्या चमत्कारिक कल्पनांवर हे नियम बसविलेले असल्यामुळे त्यांना विवेकाचा कस लावतां येत नाही. 'सोवळ्याची मीमांसा' या निबंधांत आगरकर म्हणतात, "या अर्थाच्या सोवळ्याचें मंडन विवेकदृष्ट्या करणें अत्यंत दुर्घट आहे. त्याला विवेकाची कात्री लावली की त्याच्या चिंधड्या होतात." जुन्या आचारांवर टीका करतांना आगरकरांनी त्यांतील असंबद्धता व तर्कशून्यता अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केली आहे. ब्राह्मण लोक इतर जातींच्या हातचें पाणी पीत नाहीत; पण गवळ्याने पाणी घातलेलें दूध दिलें तर तें त्यांना चालतें! मुलींच्या बाहुल्या, पुरुषांच्या पगड्या, पुस्तकें, जोडे वगैरे वस्तु कोण तयार करतो; त्यांचे घटक काय; त्यांमुळे सोवळे किती बिघडते, याचा कोणी विचारहि करीत नाही. मेलेल्या जनावरांच्या कातडयाचे जोडे नित्य वापरायला योग्य आणि ते बनवणारा चर्मकार मात्र अगदी अपवित्र मुसलमान