आगरकरांना हिंदु समाज कसा दिसला? । १२९
शास्त्रें तेवढीं ईश्वरप्रणीत, त्यांना हात लावणें हें, घोर पातक, अशी यांची समजूत आहे. जगत्कारणाच्या तोंडांतून, हातांतून, मांडींतून व पायांतून एकेक वर्ण निघाला अशी यांची वर्णोत्पत्तीविषयी कल्पना आहे, आहे ही सामाजिक स्थिति उत्तम, हींत फिरवाफिरव करण्यास कोठेहि अवकाश नाही, अशा यांच्या समाजविषयक कल्पना.' (सुधारक काढण्याचा हेतु).
"आमच्या बहुतेक जुन्या पंडितांस ऐतिहासिक पद्धति म्हणजे काय हें मुळीच ठाऊक नाही. त्यांना असें वाटतें की, जगांत जेवढे म्हणून कांही ज्ञान आहे तेवढें संस्कृत भाषेतील ग्रंथसमूहांत भरलेलें आहे. त्याच्या बाहेर चहूंकडे अंधार आहे. त्यांना असें वाटणें कांही अंशी स्वाभाविक आहे. ज्या अर्थी दुसऱ्या भाषेतील ज्ञान- भांडाराचा गंधहि त्यांना लागलेला नाही, त्या अर्थी त्यांना त्यांची माहिती कोठून कळणार? तेव्हा अर्थातच त्यांनी आपल्यापाशी असलेल्या छोटेखानी डबोल्यासच अखिल विश्वांतील संपत्समूह समजून त्याच्या महत्त्वाचे व अद्वितीयत्वाचे पोवाडे गात सुटावे, हें साहजिकच आहे." (स्वयंवर).
'गुलामांचें राष्ट्र' या लेखांत आमच्या ज्ञानाचें दारिद्र्य आगरकरांनी असेंच स्पष्ट करून दाखविलें आहे. "जें जें जुनें आहे तें सारें आम्हांस निर्दोष, पूज्य व संरक्षणीय वाटतें. आमच्या मनाच्या या खोडीमुळे जमिनींत खोल पुरलेल्या खांबा प्रमाणे आमची स्थिति झाली आहे. जुन्या वेदान्तापलीकडे वेदान्त नाही; जुन्या गणितापलीकडे गणित नाही, जुन्या अलंकारांहून अलंकार नाहीत, जुन्या व्यवहारापुढे गति नाही, जुन्या न्यायापेक्षा दुसऱ्या न्यायांत अर्थ नाही! असल्या श्रमामुळे आमचे डोळे बांधल्यासारखे होऊन आज कित्येक शतकें तेल्याच्या बैलाप्रमाणे आम्ही जुन्या शास्त्रांच्या आणि पुराणांच्या घाण्याभोवती घिरट्या घालीत आहों. या परिभ्रमणांतून सुटका झाल्याखेरीज कोणत्याहि शास्त्रांत किंवा कलेंत आमचें पाऊल पुढे पडण्याचा संभव नाही..."
"लिहिता-वाचतां येणाऱ्या लोकांत ज्यांना दुसऱ्या देशांविषयी कमीत कमी माहिती आहे असे कोणी लोक असतील, तर ते हिंदु लोक होत. यांना स्वतःस इतिहास लिहिण्याची आवश्यकता कधी वाटली नाही व लिहिण्याची अक्कल आली नाही. इतकेंच नाही तर दुसऱ्यांचे इतिहास अवलोकन करून त्यांपासून आपली सुधारणा करण्याची पर्वाहि त्यांनी कधीं केली नाही. एकंदरीत यांना इतिहासाचें माहात्म्यच समजलें नाही, असें तरी कां म्हणू नये?" 'आमचे दोष आम्हांस कधी दिसूं लागतील?' या निबंधांत आगरकरांनी अशी टीका केली आहे.
ही सयुक्तिक आहे याविषयी वाद नाही. इतिहासाविषयीची अनास्था, उपेक्षा, अज्ञान हें हिंदूंच्या संस्कृतींतले फार मोठे वैगुण्य आहे, हें खरेंच आहे; पण त्यापुढे जाऊन आगरकर जेव्हा "ज्या देशांतील व्यक्तींनी किंवा व्यक्तिसमुदायांनी केव्हाहि मोठमोठे पराक्रम केले नाहीत, ते इतिहास लिहिणार कशाविषयी आणि वाचणार
के. त्रि. ९