Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२८ । केसरीची त्रिमूर्ति

कला या सर्व बाबतींत आम्ही जुनाट झालों आहों. आमची स्थिति दगडासारखी झाली आहे; तिच्यांत कांही बदल होत नाही. कारण आमच्यांत चैतन्यच उरलें नाही. आमचें व्यक्तिजीवन व राष्ट्रजीवन खुरटले आहे. या स्थितीलाच आगरकरांनी शिलावस्था हें नांव दिले आहे; आणि त्या शिलावस्थेची विविध लक्षणें त्यांनी आपल्या निरनिराळ्या लेखांत प्रसंगाप्रसंगाने सांगितलीं आहेत.
अज्ञान
 हिंदु समाजाच्या या शिलावस्थेचें पहिलें लक्षण म्हणजे लोकांचें अज्ञान. त्यांना भूगोलाविषयी मुळीच माहिती नव्हती. पृथ्वी कशी आहे, आपला मायदेश कसा आहे, हें त्यांना ठाऊक नव्हतें. पुराणें हेंच त्यांचे ज्ञानभांडार. त्यावरच त्यांची सर्व भिस्त व श्रद्धा; आणि 'नवखंड पृथ्वी व दहावें खंड काशी' यापलीकडे या ग्रंथांची धाव गेलेली नव्हती. त्यांत प्राचीन राजांच्या कथा आहेत, पण इतिहास नाही. आपल्याकडे इतिहास लिहून ठेवण्याची पद्धतच नव्हती. त्यामुळे आपला इतिहासहि कोणाला ज्ञात नव्हता. दुसऱ्या देशांचा इतिहास जाणून घेण्याचाहि कोणी प्रयत्न केला नाही. तशी बुद्धीच कोणाला झाली नाही. त्या काळीं दशग्रंथी ब्राह्मण आणि शास्त्री पंडित कांही थोडे नव्हते; पण पुराणांबाहेरचें ज्ञान त्यांनी कधी मिळवलेच नाही, त्याची पर्वाहि केली नाही. जगांत काय घडामोडी चालू आहेत, इतर देशांतील लोकांनी शास्त्रे, कला यांत किती प्रगति केली आहे, याची त्यांनी कधी चौकशीहि केली नाही. कारण जगांत जेवढें कांही ज्ञान आहे, तें सगळे संस्कृत ग्रंथांत भरलेलें आहे, असा भ्रम त्यांना झाला होता. आणि बहुसंख्य असा जो शेतकरी व कारागीर वर्ग त्याला तर आपल्या गावाबाहेर काय उलथा-पालथ चालली आहे, त्याचीहि गंधवार्ता नसे. तिकडे राज्यसंत्ता बदलली, परधर्मीयांची आक्रमणें आलीं, तरी शेतकन्यांना त्याचा संसर्ग होत नसे.
 अशा प्रकारे समाजांतील सगळे वर्ग अज्ञानी व उदासीन होते. लिहिता-वाचतां येणाऱ्या लोकांनाहि आपल्या समाजाची अवनति कशामुळे झाली आहे, उन्नति म्हणजे काय व ती होण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत हें समजत नव्हतें. कारण कार्यकारणभाव पाहून तर्कशुद्ध विचार करण्याची पात्रताच त्यांच्या अंगीं नव्हती.
 आगरकरांच्या निरनिराळ्या निबंधांतून याविषयीचे थोडे उतारे पुढे दिले आहेत. त्यांवरून हिंदु समाजाचें ज्ञान किती भयावह होतें आणि त्यामुळे स्वतःची उन्नति साधण्यास तो किती अपात्र, असमर्थ होऊन बसला होता, याची कल्पना येईल.
 "या लोकांना समाजाच्या घटनेचीं, अभिवृद्धीचीं व लयाची कारणें ठाऊक नाहीत, पितृतर्पणापुढे यांचें ज्ञान गेलेलें नाही, अनेक देशांतील उद्योगी पुरुषांनी अहर्निश परिश्रम करून पदार्थ-धर्माचें केवढे ज्ञान संपादिले आहे, विपद्विनाशक व सुखवर्धक किती साधनें शोधून काढली आहेत, राज्य, धर्म, नीति वगैरे विषयांतील विचार किती प्रगल्भ झाले आहेत, हें यांना ऐकूनसुद्धा ठाऊक नाही... जुनीं