Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-१-

आगरकरांना हिंदु समाज कसा दिसला?



प्रास्ताविक
 हिंदु समाजांतील कोणत्या दोषांमुळे त्याचा गेल्या हजार वर्षांत विलक्षण अधःपात झाला आहे, हें लोकांना पुनः पुन्हा सांगून, आता त्याचा उत्कर्ष होण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत व पाश्चात्य लोकांचें कोणत्या बाबतींत अनुकरण केलें पाहिजे याचें दिग्दर्शन करण्याच्या हेतूने आगरकरांनी आपलें स्वतःचें 'सुधारक' नांवाचें वृत्तपत्र सुरू केलें, त्याच्या पहिल्याच अंकांत त्यांनी आपल्या देशाचें व आपल्या समाजाचें मोठें मार्मिक वर्णन केलें आहे. भरत खंडांत अनेक मोठे पर्वत, असंख्य नद्या व घनदाट अरण्यें आहेत. त्याच्या तिन्ही बाजूंना विशाल महासागर असून, त्याच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर अनेक बंदरें आहेत. आपली भूमि अत्यंत सुपीक असून, देश अन्नवस्त्राच्या बाबतींत समृद्ध आहे. आपली खनिज संपत्तीहि विपुल आहे. अशा प्रकारे आपला हा देश भौतिक संपत्तीत जगांतील कोणत्याहि देशापेक्षा कमी नाही.
 याच्या उलट आपल्या समाजाची स्थिति झालेली आहे याचें आगरकरांना अतिशय दुःख होत होतें. मानवी कर्तृत्वाच्या बाबतींत हिंदु समाज अगदी हीन दशेला पोचला आहे, त्याला शिलावस्था प्राप्त झाली आहे, असें त्यांनी म्हटलें आहे. भारताला प्रदीर्घ इतिहास लाभला आहे हें खरें, व हजार-दोन हजार वर्षांपूर्वी आपली संस्कृति बरीच उन्नत झाली होती हेंहि खरें. राज्य, धर्म, नीति, वेदान्त, न्याय गणित, ज्योतिष, इत्यादि शास्त्रे आणि विद्या व कला यांत आपण पुष्कळ प्रगति केली होती; पण त्यानंतर आपली प्रगति थांबली. आपला समाजवृक्ष आता जुना झाला आहे, वठला आहे, कसा तरी उभा आहे. समाजव्यवस्था चालीरीति, शास्त्रे,