११८ | केसरीची त्रिमूर्ति
काय, इंग्रेज जगांतच नसते तरी आमचें कांही नुकसान झालें असतें असें नाहीं, असें जहरहि आपल्या लेखणींतून ओतण्यास त्यांनी कमी केलें नाही.
सहकार्य
आणि अशा या निःस्पृह, निर्भय पुरुषाने आपल्या अल्प, अति अल्प आयुष्याच्या अखेरीस राष्ट्रीय प्रपंचांत जे बहुविध उद्योग सुरू केले त्यांत त्याच्या अंगच्या अगदी निराळ्या गुणांची कसोटी लागावयाची होती. ते गुण म्हणजे संयोजन- कौशल्य, सहकार्य, सामरस्य, मिळते-जुळते घेण्याची वृत्ति. आतापर्यंत त्यांनी कधी कोणाची परवा केली नव्हती. सरकारची, मिशनऱ्यांची, इंग्रज विद्वानांची तर नाहीच; पण बहुमताचीहि नाही. सत्य सांगण्याचा प्रसंग आला की, जग कांही म्हणालें तरी आम्ही त्याची मुळीच फिकीर करणार नाही, असें त्यांनी वारंवार लिहिलें होतें. पण आता अनेकांशी मिळते घेऊन काम करावयाचें होतें. कांही देवाण-घेवाण त्यांत अपरिहार्य होती. निःस्पृह, करारी माणसें बहुधा एकांतिक असतात. मिळते-जुळतें घेणें ही वत्ति त्यांच्या ठायीं नसते. "तेजसोर्हि द्वयोर्देवा, सख्यं वै भविता कथम्" दोन तेजस्वी पुरुषांचें सख्य होत नसतें, असें महाभारतांत म्हटलें आहे. अनेक प्रसंगी त्याचा प्रत्ययहि आपल्याला येतो. विष्णुशास्त्री यांच्या बाबतींत तसेंच होण्याचा संभव होता; पण तसें घडलें नाही. प्रसंग येताच त्यांनी तोहि गुण प्रगट केला.
संयोजन
संयोजन -कौशल्य हा विष्णुशास्त्री यांच्या व्यक्तिमत्त्वाचा फार मोठा गुण होता. त्यांची निबंधमाला त्यांनी सर्वस्वी एकट्याने चालविली. एका अक्षराची किंवा एका पैशाचीहि मदत त्यांनी कधी कोणाकडून अपेक्षिली नाही व घेतली नाही. पण शेवटच्या तीन-चार वर्षांत त्यांनी काव्येतिहाससंग्रह, चित्रशाळा, किताबखाना, न्यू इंग्लिश स्कूल, केसरी-मराठा, आर्यभूषण छापखाना असे बहुविध उद्योग सुरू केले; आणि त्यांतील बहुतेक यशस्वी झाले. संयोजन- कौशल्याच्या अभावी हे यश मिळाले नसतें. यांतील चित्रशाळा, किताबखाना हे उद्योग त्यांनी निर्वाहाचें साधन म्हणून आरंभिले होते. सरकारी नोकरी आपल्या ध्येयाच्या आड येते हे दिसूं लागल्यापासून त्यांनी असा कांही स्वतंत्र व्यवसाय करण्याचें निश्चित केलें होतें. कारण ते ध्येयवादी असले तरी व्यवहारदक्ष होते. स्वाधीन असें निर्वाहसाधन असल्यावांचून सर्व ध्येयवाद व्यर्थ ठरतो, हें त्यांनी जाणलें होतें. म्हणून १८७९ साली राजीनामा देण्यापूर्वीच त्यांनी वरील संस्था सुरू केल्या होत्या. काव्येतिहाससंग्रह हे मासिक आणि न्यू इंग्लिश स्कूल व केसरी-मराठा हे उद्योग स्वत्वजागृति, प्रबोधन, लोकशिक्षण हीं जीं त्यांचीं प्रारंभापासून ठरलेलीं उद्दिष्टें त्यांच्या परिपूर्तीसाठी होते.
निबंधमालेप्रमाणे हे उद्योग एकट्याने उरकण्यासारखे नव्हते. म्हणून त्यांनी त्यासाठी निरनिराळीं निष्णात माणसे जोडली; व त्यांच्या सहकार्याने पावले टाकली. प्रत्येक उद्योगाचें स्वरूप निश्चित करणें, त्याची आखणी करणें, त्याला अवश्य ती