व्यक्तिमत्व । ११९
साधनसामग्री सिद्ध करणें व कर्तबगार माणसें जोडून त्यांना संभाळणे हीच संयोजन- विद्या होय. काव्येतिहाससंग्रहांत महाराष्ट्राचा इतिहास, मराठी कविता व संस्कृत कविता असे तीन विभाग होते. त्यासाठी त्यांनी शंकर तुकाराम शाळिग्राम, काशिनाथ नारायण साने व जनार्दन बाळाजी मोडक यांचें सहकार्य मिळविलें. चित्रशाळेच्या उद्योगांत बाळकृष्णपंत जोशी, शाळिग्राम व पुढे वासुकाका जोशी हे त्यांचे सहकारी होते. किताबखान्याचे काम शाळिग्राम पाहत असत. 'न्यू इंग्लिश स्कूल' व 'केसरी-मराठा' या कार्यांत विष्णुशास्त्री यांना आगरकर, टिळक या महनीय पुरुषांचें सहकार्य लाभलें होतें. शिवाय माधवराव नामजोशी, वामन शिवराम आपटे यांसारखे कार्यदक्ष सहकारीहि त्यांना मिळाले होते. यांतले बहुतेक सहकारी पुढे महाराष्ट्राच्या इतिहासांत निरनिराळ्या क्षेत्रांत उंच पदाला गेले हें आपणांस माहीत आहेच. आगरकर, टिळक यांचीं नांवें तर अजरामर झाली आहेत. असे सहकारी विष्णुशास्त्री यांनी मिळविले व त्यांना एकत्र संभाळून सर्व उद्योग यशस्वी करून दाखविले यावरून त्या वेळच्या महाराष्ट्रांत त्यांनी केवढी पुण्याई संपादिली होती, हें सहज ध्यानांत येईल. इतक्या व्यक्ति आल्या की मतें, स्वभाव, कार्यक्षमता या दृष्टीने त्यांच्यांत अनेकप्रकारची भिन्नता असणारच. तें अपरिहार्यच असतें; पण तरीहि ही सर्व भिन्नता एक कार्यवाही करण्यांत विष्णुशास्त्री यशस्वी झाले. त्यांच्या अंगच्या संयोजन- विद्येचें हें फळ होय.
असें हे एक आगळें व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रांत १८५० साली जन्माला आलें होतें, व आपल्या ठायींच्या सर्व तेजाचा आविष्कार करून, स. १८८२ सालीं तें विश्वतेजांत विलीन झाले.
आज आपण स्वातंत्र्यवृक्षाच्या सावलीत उभे आहों; पण त्या आधी शंभर- सव्वाशे वर्षे पारतंत्र्याच्या रखरखीत वाळवंटांत आपण उभे होतों. आपला सर्व जीवनरस करपून चालला होता; अशा वेळीं देशाच्या एका कोपऱ्यांत आताच्या स्वातंत्र्यवृक्षाचें रोप ज्याने लावलें व स्वतःच्या भविष्याची यत्किचितहि परवा न करतां ज्याने त्याची जपणूक करण्याचे धैर्य समाजाला दिलें त्या पुरुषाचें नांव होतें- विष्णु कृष्ण चिपळूणकर.