Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११६ । केसरीची त्रिमूर्ति

करून तसें परीक्षण लिहावयास हवें होतें. आपल्या मित्राचे गुणदोष दाखविणें त्यांचें कर्तव्यच होतें. त्यामुळे त्या मित्राच्या कार्याचें उज्ज्वल रूप तेवढेच कायम राहून दोषपरिहार झाला असता व समाजाचा फायदाच झाला असता.
नाण्याच्या दोन बाजू
 अर्थात् निश्चित असें कांही सांगणे फार अवघड आहे. कारण ज्या त्यांच्य अहंवृत्तीचा वर गौरव केला आहे तिच्यांतूनच हे दोष निर्माण झाले होते. म्हणजे- त्यांच्या प्रकृतीचाच तो घटक होता; आणि तो नाहीसा झाल्यावर प्रतिपक्ष्यांवर बेगुमान हत्यार चालविण्याचें जें धैर्य त्यांच्या ठायीं होते, तें कितपत टिकून राहिलें असतें, तें सांगवत नाही. कांदा, लसूण अशा कांही कंदांना अत्यंत उग्र असा दर्प असतो. तो पुष्कळांना दुःसह होतो. त्यांना हे दोन्ही कंद आवडतात; पण कांही तरी रासायनिक प्रक्रिया करून हा दर्प तेवढा घालवावा, असें त्यांना वाटतें. त्यांना शास्त्रज्ञ सांगतात की, तो दर्प घालविला म्हणजे त्यांचे गुणहि त्याच्याबरोबरच जातील. कारण त्या दर्पातच त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तित्व असतें. विष्णुशास्त्री यांच्या बाबतींत असेंच केव्हा केव्हा वाटतें. दुराग्रह ही नाण्याची एक बाजू आहे. अत्यंत निर्भय, साहसी प्रतिपादन करण्याचे धैर्य ही त्याच नाण्याची दुसरी बाजू आहे. बहुतेक थोर पुरुषांची अशीच स्थिति असते. डॉ. जॉनसन हा जो विष्णुशास्त्री यांचा आदर्श, तोहि तसाच होता.
राजद्रोह!
 निर्भय लेखन हा जो चिपळूणकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रधान गुण तो पहिल्या अंकापासूनच दिसूं लगला होता. 'इतिहास' या प्रबंधांत तो प्रकर्षाने दिसून आला. आणि 'आमच्या देशाची स्थिति' या प्रबंधांत त्याची अगदी परिणति झालेली दिसते. या काळांत त्यांच्या प्रतिपक्ष्यांनी त्यांच्यावर इतर आरोप तर केलेच; पण प्रामुख्याने राजद्रोहाचा आरोप करण्यांत सर्वांची एकवाक्यता होती. ते सरकारी नोकर असल्यामुळे त्यांना प्रायश्चित्त देणें फारच सोपें होतें; पण येथे त्यांच्या प्रतिपक्ष्यांचा अंदाज सपशेल चुकला. कारण ही बेडी त्रासदायक होणार, हें दिसतांच, विष्णुशास्त्री यांनी लेखणी तोडण्याऐवजी ती बेडीच तोडून टाकली. त्याच्या आधीच्या वर्षी, एलिफाससाहेबाने 'इंग्रेजी भाषा' या निबंधांतील कांही उताऱ्यांचे इंग्रजी भाषांतर करून, सरकारकड़े धाडलें आणि पुण्याच्या ब्राह्मणांवर सर्रहा राजद्रोहाचा आरोप ठेवला. यामुळे भिऊन वागण्याचें तर लांबच राहिलें, उलट 'निबंधमाला, वर्ष तिसरें' या अंकांत एकंदर टीकाकारांचा परामर्श घेतांना चिपळूणकरांनी त्या एलिफासचीच रेवडी करून टाकली. हे महाविद्वान् लेखक, हे हत्तीमहाराज, स्वतःच्या आवेशानेच निवळ खड्डयांत जाऊन कोसळले आहेत!- या शब्दांत त्यांनी या साहेबाची संभावना केली; आणि शेवटीं म्हटलें की, "या योगाने आमच्या वाचकांस जर एवढे कळून येईल की, हजारो युरोपियनांच्या हातीं जाणाऱ्या पत्रांतहि