११४ । केसरीची त्रिमूर्ति
धिक लागत चालली, तसतसा इंग्लंडांत विद्येचा उत्कर्षं होऊं लागून, राजकीय प्रकरणांचाहि सामान्य लोकांत सुद्धा विचार होऊं लागला. शिवाय, नाना प्रकारच्या विषयांवर हजारो ग्रंथ होऊन, ते सर्वांस समजूं लागल्याने एकंदर राष्ट्राचे ठायीं अभिज्ञता व ज्ञानाविषयी उत्कंठाहि अधिकच प्रबळ झाली." हीच प्रगति येथे चिपळूणकरांना घडवावयाची होती. त्यांच्या निबंधमालेने वाचनाचा हव्यास लोकांना लागून त्याचें प्रत्यक्ष फल म्हणून भिन्न भिन्न क्षेत्रांतील लोकांना लेखनाची स्फूर्ति कशी झाली तें प्रारंभीच सांगितलें आहे.
इंग्रज इतिहासकार
हें इंग्रजीतील निबंधवाङमयाविषयी झालें. इंग्रजीतील 'इतिहास-ग्रंथांचें'- विवेचन त्यांनी कशासाठी केलें! पौर्वात्य देशांचा व विशेषतः भारताचा इतिहास लिहिणारे जे इंग्रज इतिहासकार त्यांचें सत्य स्वरूप दाखविण्यासाठी! ते म्हणतात, 'इकडील लोकांविषयी खरें ज्ञान पाश्चात्त्य लोकांस होण्यास पहिली अवश्य गोष्ट ही की, अज्ञानास्तव, गर्वास्तव किंवा दुराग्रहास्तव त्यांच्या मनाने ज्या वेड्या निराधार समजुती घेतलेल्या असतात त्या काढून टाकून, त्यांनी आपला चित्तरूप-पट पहिल्याने स्वच्छ धुवून काढला पाहिजे. कारण इकडील लोकांविषयी ज्ञान व यथार्थबुद्धि या गुणांत यांतील बहुतेकांचा कमतरपणाच असतो.' शेवटीं निष्कर्ष म्हणून त्यांनी सांगितला आहे तो असा : सर्व गोष्टींचा यथार्थ विचार केला असतां, असें दिसतें की, मनुष्यमात्रांत जे दोष सापडतात त्यांपासून युरोपियन लोक झाले म्हणून ते तरी तिळमात्रही मुक्त झाले आहेत असें नाही. यथार्थबुद्धि किंवा मनाची सम-वृत्ति या गुणांत सुधारणेच्या शिखरावर जाऊन पोचलेले व खऱ्या धर्माचीं तत्त्वें स्वीकारल्याने पावन झालेले आमचे पाश्चात्त्य बंधु इतरांपेक्षा वरचढ आहेत असें नाही.
अनाग्रह दुर्मिळ
इतिहासाच्या अशा सूक्ष्म व व्यापक अध्ययनानंतर बुद्धीचें फल जें अनाग्रह तें अभ्यासकाला मिळावे अशी सहजच अपेक्षा निर्माण होते; आणि विष्णुशास्त्री यांना तें मिळालें होतें हैं त्यांच्या अनेक निबंधांवरून स्पष्ट दिसतें; पण अनाग्रह आणि दुराग्रह यांचें चमत्कारिक मिश्रण त्यांच्या बुद्धींत झालें होतें; पण जगांतल्या थोर इतिहास- अभ्यासकांच्या बाबतींत अनाग्रहाची अपेक्षा बव्हंशीं विफलच झालेली दिसते. अलीकडे तो नियमच झाला आहे. मार्क्स, बकल, हंटिंग्टन, गोबिनो, चेंबरलेन, हेगेल, स्पेंगलर यांनी अर्थ, भूगोल, वंश, अध्यात्म, इत्यादींविषयी, प्रथम मनाशी कांही सिद्धान्त निश्चित करून, त्यांच्या उपपादनासाठी इतिहास त्या त्या चौकटींत वाटेल तसा ठोकून बसविला आहे. त्यांच्या इतिहास- विवेचनांत पूर्वग्रह, अभिनिवेश, अविवेक, अंधता, पक्षपात हे दोष पानोपानीं दिसून येतात. त्या मानाने विष्णुशास्त्री हे शतपटींनी जास्त तटस्थता दाखवू शकतात यांत शंकाच नाही; पण अनेक ठिकाणीं त्यांनी दुराग्रहाने कांही मते मांडली आहेत हें खरेंच आहे. याविषयी सविस्तर